अहिल्यानगर जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२५-२६ जाहीर..गुणवंत खेळाडू व मार्गदर्शकांकडून २० नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागवले..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, अहिल्यानगर यांच्या वतीने जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू आणि क्रीडा मार्गदर्शकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२५-२६’ साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये १ गुणवंत क्रीडा मार्गदर्शक तसेच १ पुरुष खेळाडू,१ महिला खेळाडू आणि १ दिव्यांग खेळाडू अशा एकूण चार पुरस्कारांचा समावेश आहे.यासाठी अर्जाचा विहित नमुना २२ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथून उपलब्ध होणार असून,परिपूर्ण भरलेले अर्ज बंद लिफाफ्यात २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करणे बंधनकारक आहे.या पुरस्कारासाठी १ जुलै २०२४ ते ३० जून २०२५ या कालावधीसह मागील ५ वर्षांतील खेळाडूंची कामगिरी, तर क्रीडा मार्गदर्शकांसाठी मागील १० वर्षांतील कार्य विचारात घेतले जाईल.
खेळाडूंनी पुरस्कार वर्षासह लगतपूर्व ५ वर्षांपैकी किमान २ वर्षे जिल्ह्याचे मान्यताप्राप्त अधिकृत स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेले असणे आवश्यक आहे. तसेच मार्गदर्शकांनी राज्यात सलग १० वर्षे कार्य केलेले असावे, वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत आणि राष्ट्रीय वा राज्यस्तरीय पदकविजेते खेळाडू घडविलेले असणे गरजेचे आहे.पात्र खेळाडू व मार्गदर्शकांनी विहित मुदतीत संघटनेमार्फत अथवा वैयक्तिकरीत्या अर्ज सादर करावेत,अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी केले आहे.
