आंदोलन सुरू,पण कर्तव्य अविरत..! कृषी अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर;दुष्काळाच्या सावटात पिकांना संजीवनी दुष्काळसदृश्य संकटात कापूस-बाजरी वाचवण्यासाठी कृषी विभाग सरसावला केव्हीके दहीगावच्या तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष शेतात मार्गदर्शन..
शिंगवे तुकाई (प्रतिनिधी):-कृषी विभागाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाही,संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर न सोडता कृषी यंत्रणेने बांधावर हजेरी लावून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.सहायक कृषी अधिकारी रुपेश प्रकाशराव पवार यांनी शिंगवे तुकाई परिसरात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कापूस व बाजरी पिकांची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला.यंदा ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे पावसाने मारलेली ओढ आणि दुष्काळसदृश्य स्थिती यामुळे पिके धोक्यात आली आहेत.या पार्श्वभूमीवर जमिनीत उपलब्ध ओलाव्याचा काटकसरीने वापर,अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पिकांची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी तांत्रिक उपायांचे सविस्तर मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके),दहीगावचे प्रमुख शास्त्रज्ञ शामसुंदर कौशिक आणि कृषी विद्या विभाग प्रमुख नारायण निबे यांनी वांजोळी येथील प्रक्षेत्राला भेट दिली.त्यांनी कापूस व बाजरी पिकांची पाहणी करून सध्याच्या अवस्थेनुसार कोणत्या उपाययोजना कराव्यात,याबाबत उपस्थित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.यावेळी तज्ज्ञांच्या हस्ते शेतकऱ्यांना विविध आवश्यक कृषी निविष्ठांचे वाटपही करण्यात आले.
“आंदोलन सुरू असले तरी शेतकरीच आमच्यासाठी केंद्रस्थानी आहे.संकटाच्या वेळी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून मार्गदर्शन करणे हे आमचे आद्यकर्तव्य असून, या दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतकरी व कृषी विभागाने एकत्रित लढणे गरजेचे आहे. रुपेश प्रकाशराव पवार, सहायक कृषी अधिकारी
हा संयुक्त उपक्रम तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे व घोडेगावचे मंडळ कृषी अधिकारी बबनराव कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.यावेळी माजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काशिनाथ पागिरे,आप्पा खंडागळे,नवनाथ पागिरे, शिवाजी येळवंडे यांच्यासह सिद्धेश्वर शेतकरी गट (कापूस उत्पादक) व काळभैरव शेतकरी गटाचे (बाजरी उत्पादक) शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक कृषी अधिकारी गणेश भराट, ज्ञानेश्वर धोधाडे यांच्यासह कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आंदोलनाच्या काळातही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेतलेल्या या पुढाकारामुळे शेतकऱ्यांमधून कृषी विभागाचे मोठे कौतुक होत आहे.
