खाकीचा सन्मान! एमआयडीसी पोलीस ठाण्याचे एपीआय हेमंत थोरात व हवालदार राजू सुद्रिक यांचा आरपीआयकडून जंगी सत्कार..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रात्रंदिवस खाकी वर्दीत सेवा बजावणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या कार्याचा सन्मान म्हणजे जनमानसाच्या सुरक्षेची पावतीच ठरते.एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे कर्तव्यनिष्ठ सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात आणि जनसामान्यांशी घट्ट नाळ जोडलेले कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार राजु सुद्रिक यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मानाचा ‘उत्कृष्ट सेवा पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल या गौरवशाली यशाबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने दोघांचाही शाल,पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन अत्यंत उत्साहात व सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
आपल्या कार्यशैलीमुळे अल्पावधीतच जनतेच्या मनात आदराचे स्थान मिळवणाऱ्या या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांचा महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा गौरव संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद मानला जात आहे.या विशेष सत्कार सोहळ्याप्रसंगी आरपीआयच्या युवक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून दोघांनाही पुढील वाटचालीस उदंड शुभेच्छा दिल्या.यावेळी अमित काळे (युवक जिल्हाध्यक्ष,दया गजभिये (युवक जिल्हा सचिव),अजय पाखरे (युवक नगर तालुका उपाध्यक्ष),अजय बडोदे (युवक शहर कार्याध्यक्ष),कृष्णा भिंगारदिवे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.”जनतेचे रक्षण आणि न्यायाची चाड ठेवून कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी समाज नेहमीच ठामपणे उभा असतो.शासनाच्या या पुरस्कारामुळे खाकी वर्दीची शान अधिकच उंचावली आहे,” अशा शब्दांत यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून दोन्ही अधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
