धक्कादायक..! ५० हजारांची खंडणी मागून बेदम चोपले..चार जिल्ह्यांत लपणाऱ्या ‘त्या’ कुख्यात गुंडाच्या अखेर LCB ने आवळल्या मुसक्या..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार ते पिसोरे खांड रस्त्यावर फिर्यादी विजय भाऊसाहेब शेळके (वय ४१,रा.गुणवडी) यांना अडवून काठी व लोखंडी टॉमीने बेदम मारहाण करत ५० हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या आणि रोख रक्कम लुटणाऱ्या मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने बेड्या ठोकल्या आहेत.या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बीएनएस कायद्यान्वये जबरी चोरी व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.प्रतिक गोकुळ पाचपुते (वय २५,रा. काष्टी,ता.श्रीगोंदा,जि. अहिल्यानगर) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.सांगली,पुणे व छत्रपती संभाजीनगर येथे वारंवार ठिकाणे बदलून पोलिसांना आरोपी चकवा देत होता.
आरोपी शिंगवे तुकाई (ता.नेवासा) परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले व पुढील तपासासाठी श्रीगोंदा पोलिसांच्या स्वाधीन केले.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड आणि पोलीस अंमलदार अतुल लोटके,राहुल द्वारके,निळकंठ कारखेले,शाहीद शेख,बाळासाहेब नागरगोजे,अजिनाथ पाखरे,अमोल कोतकर,प्रताप देवकाते,सागर ससाणे व मनोज साखरे यांनी केली.
