खळबळजनक..अवघ्या २ लाखांच्या वादातून ३४ वर्षीय तरुणाचा खून भरदिवसा पिस्तूलातून झाडल्या गोळ्या…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शिरूर तालुक्यातील लाटेवाडी आंबेडकर नगर परिसरात गुरुवारी सकाळी रक्ताचा थरार उडाला.जुन्या आर्थिक वादातून एका ३४ वर्षीय तरुणावर पिस्तुलातून सलग गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेने संपूर्ण अहिल्यानगर आणि पुणे सीमा भागात प्रचंड खळबळ उडाली आहे.हरिश गंगावणे (वय ३४) असे गोळीबारात जागीच ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.प्राथमिक तपासानुसार,२ लाख रुपयांची जुनी देवाणघेवाण आणि निघोज खदाणीतील व्यावसायिक व्यवहारावरून हा रक्तरंजित वाद पेटला होता.
अजिंक्य जगताप (वय २८,रा.गव्हाणेवाडी,ता. श्रीगोंदा) यांच्या फिर्यादीवरून रोहित सोनावणे (रा.करडे,ता. शिरूर),अनिकेत गव्हाणे (रा. गव्हाणेवाडी,ता.श्रीगोंदा,जि.अहिल्यानगर),आदित्य पवार (रा.गव्हाणेवाडी,ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर) या संशयीतांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.शिरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
