स्थानिक शाखेची मोठी कारवाई..तलवारीने प्राणघातक हल्ल्याचा मुख्य म्होरक्या अखेर पोलिसांच्या जाळ्यात..! ‘या’ ७ साथीदारांसह केला होता हल्ला..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-रात्रीच्या अंधारात दुचाकी अडवून तलवार,चाकू आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे.लोणी येथील बहुचर्चित नागेश लोट यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश उर्फ विकी आण्णासाहेब राक्षे याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.दि.५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास नागेश शंकर लोट (वय ३८,रा.लोणी, ता.राहाता) हे मोटारसायकलवरून घरी जात असताना ब्राम्हणे वस्तीजवळ दोन दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांना अडवले. काही समजण्याच्या आतच टोळक्याने त्यांच्यावर चाकू, तलवार आणि लोखंडी रॉडने डोक्यात व पाठीवर सपासप वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये (बीएनएस कलम १०९, ६१(२), ११८(२), १८९(२), १९१(२)) खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले.या पथकात पोलीस अंमलदार विष्णु भागवत, अशोक लिपणे,रमीजराजा आतार,सुनिल मालणकर, भगवान सानप,अरूण मोरे, फुरकान शेख आणि प्रशांत राठोड यांचा समावेश होता.
तपास पथक तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना,दि.१६ सप्टेंबर २०२६ रोजी संशयित आरोपी विकी राक्षे हा लोणी गावातील जनावरांच्या बाजारात पांढऱ्या रंगाच्या क्रेटा गाडीमध्ये दबा धरून बसल्याची पक्की माहिती मिळाली.पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि गणेश उर्फ विकी आण्णासाहेब राक्षे (वय २८, रा.वेताळबाबा चौक,लोणी,ता. राहाता) याच्या मुसक्या आवळल्या.ताब्यातील आरोपी गणेश उर्फ विकी राक्षे याच्याकडे सखोल विचारपूस केली असता,त्याने आपल्या इतर ७ साथीदारांसह मिळून नागेश लोट यांच्यावर हा प्राणघातक हल्ला केल्याची स्पष्ट कबुली दिली.आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील उर्वरित सातही साथीदारांची नावे निष्पन्न झाली असून,आरोपी विकी राक्षे याला पुढील कारवाईसाठी लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
