जन्माने अनाथ…पण मृत्यूनंतर माणुसकीने त्याला आपला मुलगा मानले..! ‘जुबेर’ आयुष्यभर अनाथ राहिला;निदान अखेरच्या प्रवासात त्याच्यावर बेवारस म्हणून शिक्का बसू देणार नाही काका शेळके यांच्या संवेदनशीलतेने प्रत्येकाचे डोळे पाणावले
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जन्मदात्या आई-वडिलांचा चेहराही ज्याला आठवत नव्हता,मायेची हाक ऐकण्यासाठी ज्याचे बालपण आसुसलेले राहिले आणि बालगृहाच्या चार भिंतींनाच ज्याने आपले घर मानले—त्या शेख जुबेर मुसा याच्या वाट्याला मृत्यूनंतर पुन्हा एकदा “बेवारस” ठरण्याची वेळ आली होती.मात्र,सिव्हिल हडकोच्या गणेश चौकातील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते काका शेळके यांच्या हृदयातील माणुसकी जागी झाली आणि त्यांनी जुबेरला मृत्यूनंतरही अनाथ राहू दिले नाही.जुन्नर येथील बालगृह-अनाथालयात जुबेरचे बालपण गेले.इतर मुलांना आई-वडील घरी घेऊन जाताना तो पाहत राहिला; पण त्याच्यासाठी कोणी आले नाही.बालगृहातील मित्रच त्याचे भाऊ बनले आणि तेथील कर्मचारीच त्याचे कुटुंब झाले.वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर बालगृहाचे छतही सुटले.हातात कोणाचा आधार नव्हता, डोक्यावर पालकांचा हात नव्हता;तरीही जुबेरने परिस्थितीपुढे हार मानली नाही.आपल्या मित्रांसह तो बाहेर पडला आणि स्वतःच्या कष्टाने जगण्याचा प्रवास सुरू केला.अहिल्यानगरमधील सावेडी परिसरातील सिव्हिल हडको,गणेश चौक येथे काका शेळके यांच्या घरात त्याने भाड्याने खोली घेतली. पाहता-पाहता चौदा वर्षे निघून गेली.सुरुवातीला तो भाडेकरू होता;पण हळूहळू तो शेळके कुटुंबाच्या जिव्हाळ्याचा एक भाग बनला.त्याच्या आयुष्यातील सुख-दुःख, संघर्ष आणि एकटेपणाचे काका शेळके मूक साक्षीदार होते.
काही दिवसांपूर्वी जुबेरच्या छातीत अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या.तो घराजवळील मॅक्स केअर रुग्णालयात गेला; मात्र काळाने त्याच्यावर घाला घातला.हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा अचानक मृत्यू झाला. रुग्णालयाकडून पोलिसांना माहिती देण्यात आली आणि जुबेरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.शवविच्छेदन झाले; पण त्यानंतर सर्वांत वेदनादायी प्रश्न उभा राहिला—जुबेरचा मृतदेह स्वीकारणार कोण?आई नव्हती… वडील नव्हते… भाऊ-बहीण किंवा जवळचे नातेवाईकही समोर नव्हते.त्यामुळे जुबेरचा मृतदेह बेवारस समजून महानगरपालिकेच्या संबंधित विभागामार्फत अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया सुरू झाली.ही बातमी काका शेळके यांच्या कानावर पडताच त्यांच्या काळजाचा ठोका चुकला.चौदा वर्षे डोळ्यांसमोर राहिलेला जुबेर त्यांना आठवला. त्याचे हसणे, बोलणे, संघर्ष करणे आणि एकटेपणातही स्वाभिमानाने जगणे—सारे क्षण त्यांच्या डोळ्यांसमोर उभे राहिले.“जुबेर जन्माला आला तेव्हा अनाथ होता. त्याने अर्धे आयुष्य बालगृहात काढले.पण मृत्यूनंतरही त्याच्यावर ‘बेवारस’ असा शिक्का बसू देणार नाही.रक्ताचे नाते नसले तरी तो चौदा वर्षे आमच्या डोळ्यांसमोर जगला आहे.त्याचा अखेरचा निरोप त्याच्या धर्मानुसार आणि पूर्ण सन्मानानेच झाला पाहिजे.”जुबेरचे नाव आणि धर्म लक्षात घेता अमरधाममध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करणे योग्य ठरणार नसल्याची बाब समोर आली.
त्याच्यावर मुस्लिम धर्मरीतीनुसार दफनविधी व्हावा,यासाठी काका शेळके यांनी सकाळी साडेसहा वाजता शाकीर शेख यांच्याशी संपर्क साधला.घटनेची माहिती मिळताच शाकीर शेख यांनी क्षणाचाही विलंब न करता बेलदार गल्ली येथील राजूभाई जागीरदार पाडवाले यांच्याशी संपर्क केला.एका अनाथ तरुणाचा मृतदेह पुन्हा बेवारस ठरू नये आणि त्याला त्याच्या धर्मानुसार अखेरचा निरोप मिळावा,अशी विनंती त्यांनी केली.त्यानंतर अहमदनगर यतीमखाना अँड बोर्डिंगकडून जुबेरच्या अंत्यविधीसाठी आवश्यक कफन उपलब्ध करून देण्यात आले.सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मुस्लिम धर्मपरंपरेनुसार त्याला कफन देण्यात आले,नमाज-ए-जनाजा अदा करण्यात आली आणि मुस्लिम कब्रस्तानमध्ये अत्यंत सन्मानाने दफनविधी करण्यात आला.ज्या जुबेरला बालपणी आईच्या पदराची सावली मिळाली नाही, त्याच्या पार्थिवावर अखेरच्या क्षणी माणुसकीच्या मायेचे पांघरूण घालण्यात आले. ज्याच्या डोक्यावर वडिलांचा हात नव्हता, त्याच्या अखेरच्या प्रवासात काका शेळके पितृतुल्य आधार बनून उभे राहिले.जुन्नर बालगृहातील जुबेरचे बालपणापासूनचे सहकारी संतोष गोपीनाथ घाटविसावे,संदीप प्रकाश वासकर,सतीश रामराव चव्हाण,जनार्दन सतीश रॉय हे देखील आपल्या बालपणीच्या मित्राला अखेरचा निरोप देण्यासाठी पुढे आले.बालगृहातील एका ताटात जेवलेले,एकाच छताखाली वाढलेले आणि एकमेकांच्या दुःखात आधार बनलेले हे मित्र त्या दिवशी पुन्हा एकदा जुबेरचे कुटुंब झाले.एका मित्राने हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून,तर इतरांनी खासगी नोकऱ्या करून स्वतःचे आयुष्य उभे केले आहे;पण बालगृहात निर्माण झालेले भावाचे नाते त्यांनी शेवटच्या श्वासानंतरही जपले.जुबेरच्या कबरीवर माती टाकताना प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते.ते अश्रू केवळ एका तरुणाच्या मृत्यूचे नव्हते;ते त्याच्या आयुष्यभराच्या एकटेपणाचे,संघर्षाचे आणि न मिळालेल्या कौटुंबिक प्रेमाचे होते.रक्ताचे नाते नसतानाही काका शेळके यांनी त्याच्यासाठी वडिलांची भूमिका निभावली.शाकीर शेख,राजूभाई जागीरदार पाडवाले,अहमदनगर यतीमखाना आणि जुबेरच्या बालपणीच्या मित्रांनी त्याच्या अखेरच्या प्रवासात कुटुंबाची उणीव भासू दिली नाही.
जुबेर जन्माने अनाथ होता,परिस्थितीने एकटा होता;पण मृत्यूनंतर तो बेवारस नव्हता.कारण त्याच्या अखेरच्या प्रवासात जात आणि धर्मापेक्षा माणुसकी मोठी ठरली.ज्याला आयुष्यभर स्वतःचे घर मिळाले नाही,त्याला अखेर मातीत हक्काची जागा मिळाली… ज्याला आई-वडिलांचा हात मिळाला नाही,त्याच्या जनाज्याला माणुसकीचे असंख्य हात लाभले… आणि ज्याला समाज बेवारस समजणार होता, त्याला काका शेळके यांनी आपल्या मुलाप्रमाणे अखेरचा निरोप दिला.ही केवळ एका अनाथ तरुणाच्या दफनविधीची घटना नाही; ही माणुसकी अजूनही जिवंत असल्याची हृदयस्पर्शी साक्ष आहे.
