गणपती आणायला गेलेल्या तरुणावर थेट कार घातली अन गावठी कट्ट्यातून झाडल्या गोळ्या..आरोपीचा पाठलाग करत एलसीबीने अवघ्या २४ तासांत ठोकल्या बेड्या..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-गणेशोत्सवाच्या उत्साहातच घोडनदी पुलावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत.पारनेर तालुक्यातील प्रशांत संदिप वाबळे (वय २१) हा तरुण मित्रासह शिरूर येथून गणपतीची मूर्ती घेऊन येत असताना गव्हाणवाडी पुलाजवळ हल्लेखोरांनी त्यांच्या अंगावर थेट व्हर्ना कार घातली.त्यानंतर किशोर शिंदे याने गावठी कट्ट्यातून थेट प्रशांतवर गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १०९(१), १८९(२), १९०, १९१(२) आणि आर्म ॲक्ट ३/२५ अन्वये गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला होता.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोउपनि.अनंत सालगुडे व पथकाने शिरूरमधील बाबुरावनगर येथे छापा टाकून ओम दिपक भोंडे (वय २१,रा.अण्णापूर,हल्ली रा.शिवतीर्थ हाइट्स,शिरूर) याला शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी बेलवंडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून,फरार किशोर शिंदे व इतर साथीदारांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.संतोष मुटकुळे, पोउपनि.अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार सुनिल पवार,रोहित येमुल,सागर ससाणे,विशाल तनपुरे,अमृत आढाव,फुरकान शेख आणि प्रशांत राठोड यांनी केली.
