खाकी वर्दीचा बाप्पाच्या चरणी भक्तीभाव..! गौरवनगर मित्र मंडळात पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते गणरायाची महाआरती..सामाजिक सलोख्याचे आवाहन..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-मुकुंदनगर येथील गौरवनगर मित्र मंडळाच्या गणेशोत्सवात कर्तव्य आणि भक्तीचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला.अत्यंत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात अहिल्यानगर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते श्री गणरायाची विधिवत महाआरती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी (नगर शहर भाग) दिलीप टिपरसे,भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदारांनी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन आरती केली.
गौरवनगर मित्र मंडळाच्या वतीने सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले.“गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आणि एकतेचा आरसा आहे.हा उत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी शिस्त,शांतता आणि बंधुभाव जोपासून सामाजिक सलोखा कायम ठेवावा,” असे आग्रही आवाहन यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी केले.खाकी वर्दीतील रक्षकांनी थेट बाप्पाच्या दरबारात हजेरी लावल्यामुळे उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.आरतीनंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व पोलीस बांधवांचे आभार मानले.या सोहळ्यासाठी गौरव नगर मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
