चांदबीबी महालाच्या अंधारात ‘सत्तूर गँग’चा हैदोस..पोटाला शस्त्र लावून संपवणार होते..भिंगार कॅम्प पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-भरदिवसा रस्त्याने जाणाऱ्या मजुराला अडवून त्याच्या पोटाला धारदार लोखंडी सत्तूर लावत लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना भिंगार कॅम्प पोलिसांनी फिल्मी स्टाईलने बेड्या ठोकल्या आहेत.गुन्हा केल्यानंतर चांदबीबी महालाजवळील झाडीत लपून बसलेल्या टोळीचा पोलिसांनी पाठलाग करून मुसक्या आवळल्या.कासारमळा,कापूरवाडी येथील रहिवासी असलेले संतोष गोवर्धन पवार (वय ४०, धंदा-मजुरी) हे १८ सप्टेंबर रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास भिंगार येथील आठवडे बाजार करून स्वतःच्या मोटारसायकलवरून घरी जात होते.आलमगीर ते मोरेवस्ती रस्त्यावरील प्रिन्स् लॉनच्या समोर ते आले असता,पाठीमागून विना क्रमांकाच्या मोपेड गाडीवरून आलेल्या तिघांनी पवार यांची दुचाकी अडवली.त्यांनी पवार यांना शिवीगाळ व दमदाटी करत तोंडावर चापटीने मारहाण केली.त्यानंतर थेट त्यांच्या पोटाला धारदार लोखंडी सत्तूर लावून “तुझ्या जवळ जेवढे पैसे असतील तेवढे काढून दे” असा दम दिला.फिर्यादीला खाली पाडून त्यांच्या पॅन्टच्या खिशातील ५,६००/- रुपयांची रोख रक्कम बळजबरीने काढून आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२६(२), ११९(१), ३११, ११५(२), ३५१(२)(३), ३५२, ३(५) सह आर्म ॲक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करत असताना भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की,सदर गुन्ह्यातील फरार आरोपी चांदबीबी महालाजवळील झाडीमध्ये लपून बसलेले आहेत.या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते.मात्र पथकाने वेगाने पाठलाग करत त्यांना जागेवरच पकडले. चौकशी दरम्यान आरोपींनी आपली नावे अभिलेख वाघेला (रा.भिंगार),गणेश उर्फ विकी भालेराव (रा.भिंगार),शनि निकाळजे (भिंगार) अशी असल्याचे सांगितले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.सदरची धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात,पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस अंमलदार दीपक शिंदे, रविंद्र टकले,कैलास सायंबर, दत्तात्रय मोरे,कैलास शिरसाठ,प्रमोद लहारे,वैभव झिने आणि दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू व अरुण सांगळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. भरदिवसा झालेल्या या लुटीचा छडा अवघ्या काही तासांत लावल्याने नागरिकांमधून पोलिसांचे कौतुक होत आहे.
