धक्कादायक! फोनवर विचारला जाब..अन् मठाधिपतीने दिली अश्लील भाषेत शिवीगाळ बीडमधील घटनेने एकच खळबळ..
बीड (शिरूर कासार प्रतिनिधी):-लोणी (ता.शिरूर कासार) येथील खंडोजी बाबा संस्थानाचे मठाधिपती यादव महाराज बडे यांच्याविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फेसबुकवर धनगर समाजाबाबत केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीचा जाब विचारल्यामुळे एका महिला सामाजिक कार्यकर्तीला अश्लील भाषेत शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न केल्याचा गंभीर आरोप महाराजांवर ठेवण्यात आला आहे.तक्रारदार महिला सामाजिक कार्य करीत असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खंडोजी बाबा संस्थानाचे मठाधिपती यादव महाराज बडे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘फेसबुक’वर धनगर समाजाबद्दल आक्षेपार्ह कमेंट केली होती.दि.१७ सप्टेंबर रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांनी आपल्या मोबाईलवरून यादव महाराज यांना फोन करून, “तुम्ही फेसबुकवर धनगर समाजाबद्दल आक्षेपार्ह कमेंट करून समाजाचा अपमान का केला?” असा जाब विचारला. यावर संतापलेल्या यादव महाराज यांनी उद्धटपणे उत्तर देत, “मी धनगर समाजाबद्दल केलेली कमेंट बरोबर आहे,” असे म्हटले.इतकेच नव्हे तर, लज्जा उत्पन्न करण्याच्या उद्देशाने अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली,असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारानंतर फिर्यादी यांनी थेट शिरूर पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून शिरूर पोलिसांनी मठाधिपती यादव महाराज बडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS),२०२३ च्या कलम ७९ (स्त्रीच्या लज्जेस धक्का पोहोचवणे / विनयभंग) अन्वये गुन्हा (गु.र.क्र. ०२२२/२०२६) दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर कासार पोलीस अंमलदार विलास बन्सीधर खरात यांच्याकडे सोपवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.एका मठाधिपतीवर अशा प्रकारचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
