‘त्या’ काळ्या स्कॉर्पिओवर पोलिसांचा छापा लाखोंची नामांकित दारू जप्त..अहिल्यानगर उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह?
अहिल्यानगर संगमनेर (प्रतिनिधी/राजेंद्र मेढे ):-पुणे-नाशिक महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर दारूची वाहतूक सुरू असल्याचा पर्दाफाश घारगाव पोलिसांनी केला आहे.गोपनीय माहितीच्या आधारे बोटा गावच्या हद्दीत सापळा रचून पोलिसांनी एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीवर छापा टाकत ५ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन , अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव हद्दीत अवैध धंद्यांवर धडक मोहीम राबवली जात आहे.२१ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास पोलिसांना गुप्त बातमी मिळाली की,पुण्याच्या दिशेने बोटा गावातून आंबीदुमाला गावाकडे एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी बेकायदेशीर देशी व विदेशी दारू घेऊन जाणार आहे.या माहितीवरून पोलिसांनी तत्काळ पुणे-नाशिक हायवे रोडवरील बोगद्याजवळ बाजूला थांबून पाळत ठेवली.
दुपारी सुमारे १:२० च्या सुमारास पुण्याच्या बाजूकडून सर्व्हिस रोडने काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी येताना दिसली.पोलिसांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. गाडीतील चालक दौलत साहेबराव महाले (वय ३२) व साथीदार गणेश पांडुरंग फापाळे (वय ४६,दोघे रा. बेलापूर,ता.अकोले) यांना ताब्यात घेऊन पंचांसमक्ष गाडीची झडती घेतली असता वाहनात विविध नामांकित कंपन्यांच्या विदेशी व देशी दारूच्या बाटल्यांचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी ३२ हजार रुपये किमतीचा दारूचा साठा व ५ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ असा एकूण ५ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. प्राथमिक चौकशीत हा दारूचा माल जुन्नर परिसरातील एका वाईन शॉपवरून आणल्याचे व गाडी सतिष गागरे यांच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्रोव्हिबिशन ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या पथकातील अंमलदार प्रमोद गाडेकर,सुभाष बोडखे व सचिन धनाड यांनी ही कामगिरी बजावली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत.
