अहिल्यानगर पोलीस दलात मोठा फेरबदल ! ८४ कर्मचाऱ्यांची विनंती बदली,तर LCB मध्ये ‘या’ १६ जणांना संधी
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):- महिन्यांपासून जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस दलाचे लक्ष लागून राहिलेल्या विनंती बदल्यांचे अखेर गॅझेट समोर आले आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत जिल्ह्यातील तब्बल ८४ पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदारांच्या बदल्या केल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखा (LCB) ही पोलीस अधीक्षकांची अत्यंत महत्त्वाची शाखा मानली जाते. या शाखेत जाण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांश अंमलदार उत्सुक असतात. या नव्या गॅझेटमध्ये १६ जणांना एलसीबीमध्ये काम करण्याची संधी मिळाली असून, यामध्ये मागील वर्षी झालेल्या गॅझेटमध्ये राहिलेल्या कर्मचाऱ्यांना अधिक सामावून घेण्यात आले आहे.
यामध्ये पंकज व्यवहारे,अतुल लोटके,अभिजीत अरकल,संतोष खैरे,विकास साळवे, निळकंठ कारखिले,अरुण गांगुर्डे,बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे,सुनिता पवार,दिपक जाधव,नंदिनी झिने,महादेव लगड,अजिनाथ पाखरे,प्रताप देवकाते व भगवान सानप यांचा समावेश आहे.दरम्यान, गुरुवारी (दि. २३) पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी प्रशासकीय बदल्यांबाबतची कर्मचाऱ्यांची अडचण सोडवण्यासाठी जिल्ह्यातील ६३ जणांना बोलावले होते. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या प्रशासकीय बदल्यांमुळे नाराज असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी दालनात ही हजेरी लावली होती. त्यापैकी ३७ जणांच्या प्रशासकीय बदल्यांमध्ये फेरबदल करण्यात आले असून, २१ जणांच्या बदल्यांना वर्षभरासाठी स्थगिती देण्यात आली आहे.
त्यामुळे हे कर्मचारी सध्या आहेत त्याच पोलीस ठाण्यात कार्यरत राहतील.जिल्ह्यातील प्रशासकीय व विनंती बदल्या झालेल्या पोलीस अंमलदारांना संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यमुक्त (रिलीव्ह) करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. कार्यमुक्त न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा सज्जड इशारा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिला आहे. तसेच अंमलदारांना कार्यमुक्त करून तसा अनुपालन अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
