निमगाव शाळेच्या बालदिंडीतून वारकरी संस्काराचा जागर;बालगोपाळांच्या भक्तीरसात निमगाव खैरी न्हाऊन निघाले..!
श्रीरामपूर (प्रतिनिधी):-भारतीय संस्कृती, संत परंपरेचा महान वारसा,पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार चिमुकल्या मनांवर बिंबवण्याच्या उद्देशाने,श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर भव्य ‘बालदिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. टाळ-मृदुंगाचा गजर,हातात भगव्या पताका आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात निघालेल्या या बालदिंडीने संपूर्ण निमगाव परिसर भक्तिमय करून टाकला.कार्यक्रमाची सुरुवात पालखीतील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींचे भावपूर्ण पूजन करून झाली. पारंपारिक वारकरी वेशभूषेत नटलेले अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील चिमुकले विद्यार्थी या दिंडीचे मुख्य आकर्षण ठरले.माथ्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या तसेच हातात टाळ व भगव्या पताका घेतलेले बाल वारकरी आणि विठ्ठल-रुक्मिणीच्या रूपात सजलेली मुले पाहून उपस्थितांचे डोळे पारणे फिटले.ग्रामस्थांकडून बाल वारकऱ्यांचे भव्य स्वागत ही बालदिंडी गावातून जात असताना ग्रामस्थांनी ठिकठिकाणी पालखीचे दर्शन घेतले.
गावातील माता-भगिनींनी बाल वारकऱ्यांचे औक्षण करून आणि रांगोळ्या काढून दिंडीचे उत्साहात स्वागत केले. या प्रसंगी महिलांनी उत्स्फूर्तपणे अभंग गायन आणि फुगड्यांचा आनंद घेतला. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनीही अभंगाच्या ठेक्यावर ‘पावली’ आणि ‘फुगडी’ धरल्यामुळे वातावरणात एक वेगळाच उत्साह आणि भक्तीचा रंग भरला होता.
महाप्रसादाचे वाटप या सोहळ्यात सहभागी झालेल्या बाल वारकऱ्यांना केळी, राजगिरा लाडू, शाबुदाणा खिचडी आणि फराळाच्या चिवड्याचा महाप्रसाद वाटण्यात आला. हा महाप्रसाद मार्केट कमिटीचे माजी उपसभापती नितीन भागडे, संतोष पाराजी भागडे, सुजित भागडे आणि संदीप भागडे यांच्या वतीने देण्यात आला.संस्कार आणि सामूहिकतेचे दर्शन विद्यार्थ्यांची शिस्त, भक्तीभाव आणि सामूहिकतेचे दर्शन घडवणाऱ्या या उपक्रमाने भक्ती, समता, सेवा आणि भारतीय संस्कृतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा संदेश दिला. संपूर्ण गावात या उपक्रमाची मोठी चर्चा रंगली होती.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश तरस, उपाध्यक्षा सोनाली साबळे, सदस्य महेंद्र साबळे, पंढरीनाथ निमसे, पूजा कालंगडे, अर्चना जिवरख, जयश्री भागडे, पूजा धुळगंड, राजश्री भागडे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे, शिक्षिका प्रतिभा तोरणे, मिना निकम, सुधा गमे, जयश्री दिवटे आदींनी विशेष परिश्रम घेतले.शाळेच्या या कौतुकास्पद उपक्रमाचे निमगाव खैरीचे सरपंच दत्तात्रय झुराळे, उपसरपंच विजयसिंग परदेशी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विलास शेजुळ, गटशिक्षणाधिकारी क्रांती अडसूद, शिक्षण विस्तार अधिकारी दीपक त्रिभुवन, केंद्रप्रमुख शितल गायकवाड यांच्यासह निमगाव खैरीतील ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले.
