अहिल्यानगरमध्ये पुन्हा एमडी ड्रग्जचा धुमाकूळ..६ लाखांच्या एमडी ड्रग्जसह राजस्थानचा तरुण एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहर आणि परिसरात सध्या ड्रग्ज माफियांचे जाळे वेगाने पसरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. निंबळक बायपास परिसरातील लामखडे पेट्रोल पंपाजवळ एमआयडीसी पोलिसांनी धाडसी कारवाई करत तब्बल ६ लाख रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) ड्रग्जसह एका परप्रांतीय तरुणाला रंगेहाथ पकडले.या कारवाईत पोलिसांनी ड्रग्ज,कार आणि मोबाईल असा एकूण ११ लाख ४३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.शुक्रवारी (२४ जुलै) सकाळी एमआयडीसी पोलिसांचे पथक गस्त घालत असताना, लामखडे पेट्रोल पंपापुढे दोन विनानंबर चारचाकी वाहने अत्यंत संशयास्पदरीत्या उभी असल्याचे दिसून आले.संशय बळावल्याने पोलीस जवळ पोहोचताच एका कारमधील दोघे जण भरधाव वेगाने पसार झाले.मात्र,दुसऱ्या विनानंबर स्विफ्ट कारजवळ उभ्या असलेल्या तरुणाला पोलिसांनी जागीच पकडले.
कारची पाहणी केली असता मागील सीटवर ठेवलेल्या प्लास्टिक पिशवीत २५.४९ ग्रॅम, १.१६ ग्रॅम, १.१९ ग्रॅम आणि १.२२ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थ आढळले.पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव रविप्रकाश भेराराम बिश्नोई (वय २९) असून तो मूळचा राजस्थानचा (जि.जालोर) रहिवासी आहे.सध्या तो सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे वास्तव्यास होता.प्राथमिक चौकशीत हे ड्रग्ज विक्रीसाठी आणल्याची कबुली त्याने दिली आहे. राजस्थान वरून अहिल्यानगर शहरात व परिसरात एमडी ड्रग्जचा मोठा पुरवठा केला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.फरार साथीदारांचा शोध सुरु असून घटनास्थळावरून पळून गेलेल्या दोन संशयितांपैकी एकाचे नाव ‘तांबे’ असल्याचे समोर आले असून दुसरा अनोळखी आहे.पोलीस सध्या या दोघांचा तीव्रतेने शोध घेत आहेत.ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे, पोलीस अंमलदार उमेश शेरकर,सचिन हरदास,सूरज देशमुख व अक्षय रोहोकले यांच्या पथकाने केली. अहिल्यानगरमध्ये आधी सावेडी परिसरात तोफखाना पोलिसांनी कारवाई करत त्यांना १५५ ग्रॅम एमडी सापडले होते आणि आता ही दुसरी मोठी कारवाई झाल्याने ड्रग्ज रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
