शिराढोण येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ उत्साहात संपन्न;तब्बल ३,५४५ लाभार्थ्यांना मिळाला योजनांचा थेट लाभ!कार्यालयातूनही नागरिकांची कामे वेळेतच व्हावीत: आमदार कैलास पाटील-घाडगे
बिलाल कुरेशी (जिल्हा प्रतिनिधी)
धाराशिव/कळंब:-सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार चकरा माराव्या लागू नयेत,त्यांच्या वेळेची आणि श्रमांची बचत व्हावी,याच मुख्य उद्देशाने महसूल प्रशासनाने ‘समाधान शिबिरा’चे आयोजन केले आहे. या शिबिरात ज्या तत्परतेने कामे होत आहेत,त्याच धर्तीवर व कार्यतत्परतेने पुढील काळातही नागरिकांची सर्व कामे शासकीय कार्यालयांमधून वेळेत झाली पाहिजेत,असे प्रतिपादन कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील-घाडगे यांनी केले.कळंब तालुक्यातील शिराढोण येथील ओमसाई मंगल कार्यालयात आज २४ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ पार पडले. उपस्थितांना संबोधित करताना आ.पाटील म्हणाले की, समाधान शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे.अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक मानसिकतेने सर्वसामान्य नागरिकांच्या दारी जाऊन सेवा दिली पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून जनतेसाठी काम करणे आवश्यक आहे.तसेच,अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरू असून, नागरिकांना छोट्या-छोट्या कामांसाठी कार्यालयात येण्याची वेळ येऊ नये,यासाठी प्रशासन कार्यरत आहे. यावेळी त्यांनी नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करावी, विशेषतःमहिलांनी आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहावे,असे आवाहनही केले.
प्रशासकीय प्रमुख व लोकप्रतिनिधींची उपस्थिती
या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हापरिषद समाजकल्याण समितीचे सभापती श्री. कोकणे,कळंब पंचायत समितीच्या सभापती राजश्री वरपे,धाराशिव पंचायत समितीच्या सभापती गोकर्णा कदम,उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे,जिल्हापरिषद सदस्या कांचन संगवे,पेकराज गाडगे,अजित लाकाळ, पंचायत समिती सदस्य मनोज घोगरे,दत्ता माकोडे, धाराशिवच्या तहसीलदार डॉ. मृणाल जाधव,कळंबच्या अप्पर तहसीलदार प्राजक्ता पाटील तसेच शिराढोणच्या सरपंच लक्ष्मीबाई म्हेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की,ग्रामीण भागातून समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. महसूलमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, प्रशासकीय यंत्रणांनी प्रभावी काम केल्यास त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतो.तर सभापती राजश्री वरपे आणि जि.प.सदस्या कांचन संगवे यांनी नागरिकांना महाआरोग्य शिबिर व इतर योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.विविध योजनांतून ३,५४५ लाभार्थ्यांना दिलासा या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांकडून एकसाथ ३,५४५ लाभार्थ्यांना थेट लाभ वितरीत करण्यात आला. श्रावणबाळ/संजय गांधी निराधार योजना (३९३ लाभार्थी), ईजीएस केवायसी (११५), शैक्षणिक दाखले (४८१), शिधापत्रिका (७०), किसान विकास पत्र (२७) व इतर सेवा.उपविभागीय अधिकारी कार्यालय: जात प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलेअर (५३६ लाभार्थी).महिला व बाल विकास विभाग: बेबी केअर किट (२७१), बालसंगोपन योजना (१२०), आधार संलग्न सेवा (३०), प्रधानमंत्री मातृवंदना (२०), एकल महिला (१७) व दिव्यांग योजना (१५).
गट शिक्षण कार्यालय (अपंग कल्याण): दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक, आर्थिक योजना व साहित्यांचे वाटप (एकूण १,४०० हून अधिक लाभार्थी/नग).पंचायत समिती व कृषी विभाग: प्रधानमंत्री आवास योजना (५१), स्वच्छ भारत मिशन (१२), लखपती दीदी प्रमाणपत्रे (३७), नानाजी देशमुख कृषी संजीवनी (५४).
इतर विभाग: महावितरण, भूमी अभिलेख, पशुसंवर्धन व नगर परिषद कळंबअंतर्गत विविध योजनांचा लाभ देण्यात आला.गुणवंत विद्यार्थी व लाभार्थ्यांचा विशेष सत्कार शिबिरा दरम्यान NEET परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणारे विद्यार्थी—हर्षराज माने, तन्मय वाघमारे, विश्वजित बांगर, कु. अश्लेषा लिमकर, अथर्व पवार आणि श्लोक हिरे यांचा गौरव करण्यात आला.
तसेच आबासाहेब कापसे, बंडू आवाड, स्वप्नील नरसिंगे, अमोल शितोळे, प्रशांत शितोळे यांना जात प्रमाणपत्रे; तर संजय बाळापुरे, लखन सहाणे, अमोल साठे, गोविंद वाघमारे, शंकर डांगे यांना उत्पन्न व अधिवास प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. २०११ पूर्वीच्या निवासी प्रयोजनातील अतिक्रमण नियमितीकरणाचे आदेश मिटू पांचाळ, अरबाज शेख, कुशीद शेख, फकीर शेख यांना सुपूर्द करण्यात आले.याशिवाय विविध महिला स्वयंसहाय्यता गट (हम साथ है, सुहाणा, जिजाऊ, अष्टविनायक इ.) आणि शेकडो वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व आर्थिक लाभांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.शासकीय माहिती स्टॉल्स ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू शिबिरस्थळी आरोग्य विभागाचे महाआरोग्य शिबिर, कृषी, पुरवठा, सामाजिक वनीकरण, उमेद अभियान, पोलीस विभाग, सेतू केंद्र, पशुसंवर्धन, रोजगार हमी योजना आदी विविध विभागांचे माहिती स्टॉल उभारण्यात आले होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना घडीपुस्तिका व माहितीपत्रकांचे वाटप करून योजनांची सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कळंबचे उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार धाराशिवच्या तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी मानले. या शिबिरास कळंब व धाराशिव तालुक्यातील नागरिक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
