कडब्याच्या पिकात गांजाची शेती! 7.43 लाखांचा गांजा जप्त अन् 75 वर्षांच्या वृद्धाला बेड्या..स्थानिक गुन्हे शाखा आणि बेलवंडी पोलिसांची संयुक्त कारवाई..
अहिल्यानगर/श्रीगोंदा (प्रतिनिधी):-कडब्याच्या (चाऱ्याच्या) आड लपवून शेतात गांजाची राजरोसपणे शेती करणाऱ्या एका ७५ वर्षीय वृद्धाचा कारनामा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) उघडकीस आणला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ येथे अहिल्यानगर एलसीबी आणि बेलवंडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ७ लाख ४३ हजार ८०० रुपये किमतीचा ३७ किलो १९० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.याप्रकरणी आरोपी वृद्धाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.गुप्त बातमीदाराच्या खबरीने फुटला भांडाफोड
‘नशा मुक्त भारत’ अभियानाअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यात अमली पदार्थ विक्री व लागवडी विरोधात कडक कारवायांचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर एलसीबीचे पोलीस निरीक्षक तथा अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी संतोष मुटकुळे यांना गुप्त बातमीदाराद्वारे बातमी मिळाली की,कोथुळ (ता. श्रीगोंदा) येथील दिलीप गंगाधर लाटे (वय ७५) याने आपल्या राहत्या घरासमोरील शेतात बेकायदेशीरपणे गांजाची लागवड केली आहे.माहिती मिळताच एलसीबी पथकाला तात्काळ कारवाईसाठी रवाना करण्यात आले.पथकाने बेलवंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर आणि त्यांच्या टीमला सोबत घेऊन कोथुळ येथील संशयिताच्या घरावर व शेतावर धाड टाकली.कडब्याच्या पिकात लपवली होती गांजाची झाडे पोलीस पथकाने पंचांसमक्ष घरासमोरील शेताची पाहणी केली असता,कडब्याच्या पिकाच्या आडोशाने लावली गेलेली हिरवट रंगाचा पाला आणि फुले असलेली कॅनबिस वनस्पती (गांजाची झाडे) आढळून आली.पोलिसांनी तात्काळ ही झाडे ताब्यात घेऊन वजन केले असता,३७ किलो १९० ग्रॅम वजनाचा तब्बल ७,४३,८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलिसी खाक्या दाखवताच, “मी स्वतः नशा करण्यासाठी ही झाडे लावली होती,” अशी कबुली आरोपी दिलीप लाटे याने दिली.याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अमोल पोपट कोतकर यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात आरोपी दिलीप गंगाधर लाटे याच्याविरुद्ध गु.र.नं. २७९/२०२६ अन्वये ‘गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा, १९८५’ (NDPS Act) चे कलम ८(ब), २०(अ)(i), २०(ब)(२)(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाणे करत आहे.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे शशाखेचे (LCB) पो.नि.संतोष मुटकुळे, पोउनि कृष्णकुमार सेदवाड, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर,किशोर शिरसाठ,सुनील मालणकर, अमोल आजबे तसेच बेलवंडी पोलीस ठाणे सपोनि.नंदकुमार सोनवलकर,पोलीस अंमलदार यमगर,धर्मराज दहिफळे, विनोद पवार,राजू भोर यांनी केली आहे.
