हद्दपार आरोपीचा एमआयडीसीत मुक्त संचार..गुप्त बातमीदाराचा एक फोन एलसीबीने आवळल्या मुसक्या!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यातून ६ महिन्यांसाठी हद्दपार (तडीपार) केलेला सराईत आरोपी बंदी झुगारून अहिल्यानगर शहरात बिनधास्त वावरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) सतर्क पथकाने सापळा रचून या आरोपीला बोल्हेगाव परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत.करण खंडू पाचारणे (वय ३२,रा. आदर्शनगर,नागापूर,ता.जि. अहिल्यानगर) असे बेकायदेशीर वास्तव्य करताना रंगेहाथ पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची तपासणी करून, ते नियमांचे उल्लंघन करून पुन्हा आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत.त्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक शहरातील तडीपार आरोपींचा शोध घेत होते.दि.२२ जुलै २०२६ रोजी हे पथक गस्तीवर असताना,गुप्त बातमीदारामार्फत एलसीबीला एक खात्रीशीर बातमी मिळाली.जिल्ह्यातून तडीपार केलेला गुंड करण पाचारणे हा एम.आय.डी.सी. परिसरात विनापरवाना फिरत असल्याची माहिती समोर आली.
माहिती मिळताच पथकाने क्षणाचाही विलंब न लावता एम.आय.डी.सी. आणि गांधीनगर,बोल्हेगाव भागात शोध मोहीम राबवून संशयित करण पाचारणे याला ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपीची कसून चौकशी करून त्याच्या हद्दपारीच्या अभिलेखाची (रेकॉर्ड) खात्री केली असता,उपविभागीय दंडाधिकारी (अहिल्यानगर भाग) यांनी त्याला अहिल्यानगर जिल्ह्यातून ६ महिन्यांसाठी हद्दपार (तडीपार) केल्याचे निष्पन्न झाले.तरीही शासकीय आदेशाचे उल्लंघन करून तो अहिल्यानगर शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करत होता.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार प्रकाश नवनाथ मांडगे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपी करण पाचारणे याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये (गु.र.नं. ६१६/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री.संतोष मुटकुळे,कृष्णकुमार सेदवाड पोलीस उपनिरीक्षक,पोलीस अंमलदार विष्णू भागवत,सोमनाथ झांबरे,राहुल डोके,प्रकाश मांडगे आणि प्रदिप शेळके यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने पार पाडली. एलसीबीच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
