जॉगिंग पार्कबाहेर थरार..! भरदिवसा हातात धारदार कोयता घेऊन फिरणाऱ्यास
भिंगार पोलिसांनी ठोकल्या बेड्या..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरातील एका गजबजलेल्या जॉगिंग पार्कबाहेर अचानक एक तरुण हातात धारदार कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वीच भिंगार कॅम्प पोलिसांनी दाखवलेल्या अफाट तत्परतेमुळे एक मोठा संभाव्य अनर्थ टळला आहे.भिंगार शहरातील गौतम बुद्ध जॉगिंग पार्क परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अत्यंत शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,दि. १४/०५/२०२६ रोजी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून एक अत्यंत खात्रीशीर आणि खळबळजनक माहिती मिळाली.भिंगार शहरातील गौतम बुद्ध जॉगिंग पार्क जवळ एक इसम त्याच्या हातात धारदार कोयता घेऊन फिरत असून “आत्ता गेल्यास तो मिळून येईल” अशी ती माहिती होती.माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांनी सेकंदाचाही वेळ न घालवता कॅम्प पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अंमलदारांना तात्काळ घटनास्थळी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.आदेश मिळताच तपास पथकातील अंमलदारांनी बातमीतील नमूद ठिकाणी धाव घेतली आणि खात्री केली. तेंव्हा त्यांना गौतम बुद्ध जॉगिंग पार्क जवळील एका लिंबाच्या झाडाखाली एक इसम संशयास्पद रित्या उभा असलेला दिसला आणि त्याच्या हातात उघडा धारदार कोयता चमकत होता!
पोलिस आल्याची चाहुल लागताच त्या तरुणाने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र,आधीच सज्ज असलेल्या पोलीस अंमलदारांनी त्याला घेराव घालून जागीच झडप मारली आणि त्याच्या हातातील जीवघेणा कोयता सुरक्षितपणे ताब्यात घेतला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर विश्वासात घेऊन त्या कोयत्याबाबत विचारपूस केली,मात्र त्याने पोलिसांना कोणतीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.त्यानंतर पोलिसांनी त्याचे नाव-गाव विचारले असता त्याने त्याचे नाव आयन समिर पठाण (वय २१ वर्षे,रा.अक्सा मशिद समोर, आलमगीर,ता. जि. अहिल्यानगर) असे असल्याचे सांगितले.
सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे घातक हत्यार बाळगल्याप्रकरणी या इसमाविरुद्ध कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गु.रं.- ३१३/२०२५ आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात,पोलीस अंमलदार दिपक शिंदे,रविंद्र टकले, अहमद इनामदार,प्रमोद लहारे,कैलास शिरसाठ आणि महिला पोलीस अंमलदार किरण बर्वे यांनी अत्यंत धाडसी कामगिरी चोखपणे बजावली आहे.पोलिसांच्या या तत्परतेमुळे जॉगिंग पार्क परिसरात येणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असून पोलिसांचे कौतुक होत आहे.
