Crime..’त्या’ तिघांनी उबेर बुक केली,पण वाटेत जे घडलं त्याने थरकाप उडेल..! बंदुकीचा धाक दाखवून चालकाचे हातपाय बांधून जंगलात फेकलं अन्…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पुणे येथून प्रवासी घेऊन निघालेल्या एका उबेर कार चालकाला भररस्त्यात बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.चोरट्यांनी केवळ कार चालकाचे पैसे आणि सोन्याची अंगठीच लुटली नाही,तर त्याला बेदम मारहाण करून त्याची स्विफ्ट डिझायर कार देखील बळजबरीने चोरून नेली.या थरारक घटनेमुळे ट्रॅव्हल्स चालक आणि प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.फिर्यादी विशाल सूर्यकांत कट्टीमनी (वय २५ वर्षे,रा. कोल्हेवाडी,सिंहगड रोड,जि. पुणे) हे टूर आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतात.ते आपल्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार (नंबर MH12 YB 8481) द्वारे ऑनलाईन उबर (Uber) ॲपवरून बुकिंग घेऊन पुणे येथील वाकडेवाडी एसटी स्टँडवरून मळेवाडी, शेवगाव येथे जाण्यासाठी ३ प्रवाशांना घेऊन निघाले होते.
प्रवास सुरू असताना,१४ जून २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास अहिल्यानगर मध्ये खोसपुरी शिवार परिसरातील रिलॅक्स हॉटेलच्या पुढे १५० मीटर अंतरावर गाडी आली असता,गाडीतील एका प्रवाशाने लघवी करण्यासाठी गाडी थांबवण्यास सांगितली. चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली.तो प्रवासी लघवी करून पुन्हा गाडीत येऊन बसला.गाडी पुन्हा सुरू होताच,पाठीमागील सीटवर बसलेल्या अज्ञात इसमाने अचानक फिर्यादी विशाल यांच्या डोक्याला बंदूक (पिस्तूल) लावली.त्याच वेळी त्यांच्या शेजारी बसलेल्या इसमाने त्यांचे हात घट्ट पकडले आणि पाठीमागील दुसऱ्या इसमाने दोरी काढून फिर्यादीचे हात बांधून टाकले.एवढ्यावरच न थांबता,आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात कोणत्यातरी जड आणि टणक वस्तूने प्रहार करून गंभीर दुखापत केली आणि त्यांना चालत्या गाडीतून खाली ढकलून दिले.
यानंतर आरोपींनी गाडीतील रोख रक्कम,फिर्यादीच्या हातातील सोन्याची अंगठी आणि ५,७०,५०० रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ऐवज बळजबरीने घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला.या धक्कादायक प्रकारानंतर जखमी अवस्थेत चालकाने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर ग्रामीण विभाग यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि/थोरात हे करत आहेत.आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
