MCOCA मोक्यातील कुख्यात आरोपीसह तिघांना बेड्या..!स्थानिक गुन्हे शाखेची थरारक कारवाई:संगमनेर,नाशिक अन् अहिल्यानगर हादरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-वेल्हाळे (ता.संगमनेर) येथे घरात घुसून कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करत २ लाख ९० हजारांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे.या कारवाईत थेट ‘मोक्का’ (MCOCA) कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेला आणि नाशिकसह अहिल्यानगर जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या कुख्यात दरोडेखोरासह त्याच्या साथीदाराला आणि चोरीचे सोने घेणाऱ्या सराफाला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे.दि.१२ जुलै २०२६ रोजी रात्री १२:१५ वाजेच्या सुमारास वेल्हाळे (हरीबाबावाडी,ता.संगमनेर) येथील रहिवासी गणेश गोकुळ चव्हाण यांच्या घरी ५ अनोळखी दरोडेखोरांनी दरोडा टाकला.दरोडेखोरांनी चव्हाण यांच्या भावावर लोखंडी कुऱ्हाडीने वार करून घरातील इतरांना बेदम मारहाण केली. त्यानंतर घरातील सोन्या-चांदीचे दागिने,रोख रक्कम आणि २ मोबाईल असा एकूण २,९०,० रू.चा मुद्देमाल लुटून पसार झाले होते. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६७६/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१०(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. संतोष मुटकुळे यांना समांतर तपासाचे आदेश दिले. त्यावरून सपोनि.हरिष भोये, पोलीस अंमलदार विष्णु भागवत,भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर,बाळू खेडकर, सुनिल मालणकर,किशोर शिरसाठ आणि अरूण मोरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांमार्फत माहिती गोळा केली.
दि.३० जुलै २०२६ रोजी मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे पथकाने वाघुंडे (ता.पारनेर) येथून दोन मुख्य आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या मुख्य आरोपी अक्षय काळे याने गुन्ह्याची कबुली देत लुटलेले सोन्या-चांदीचे दागिने शैलेंद्र चंद्रकांत डहाळे (वय ५०,रा.पारनेर) याला विकल्याचे सांगितले.तपासात सहकार्य न केल्याने पोलिसांनी शैलेंद्र डहाळे यालाही ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी तिन्ही आरोपींना संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.अक्षय काळे याने दिलेल्या माहितीनुसार या दरोड्यात त्याचे इतर ४ साथीदारही सामील होते.ही धडक कारवाई श्री.मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक,श्री. सोमनाथ वाकचौरे अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
