रेल्वेस्टेशनवर मध्यरात्री थरार..! ९ दरोडेखोर तलवारी अन् तिखटासह दबा धरून LCB ची अचानक एन्ट्री अन ७ जण जाळ्यात!
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर ३१ जुलै २०२६):-गुरुपौर्णिमा उत्सवामुळे शिर्डीत अलोट गर्दी जमलेली असतानाच, दुसरीकडे एका अत्यंत भयानक आणि थरारक गुन्ह्याचा कट शिजत होता! शिर्डी रेल्वे स्टेशनजवळील निर्मनुष्य रेल्वे ट्रॅकच्या अंधारात,हातात तलवारी, धारदार सुरे आणि डोळ्यात जिवाची भीती घालणारी मिरची पूड घेऊन तब्बल ९ दरोडेखोर दबा धरून बसले होते.पण,दरोडा पडण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने असा काटा काढला की संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष मुटकुळे यांनी पोसई/कृष्णकुमार सेदवाड व पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, विजय पवार,शामसुंदर जाधव, राहुल डोके,भगवान थोरात, रमीजराजा आतार,विशाल तनपुरे व भगवान धुळे अशांचे पथक नेमून शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत गस्तीसाठी रवाना केले होते.तपास पथक गस्त घालत असताना पथकास गुप्तबातमीदाराकडून बातमी मिळाली की,शिर्डी ते शिर्डी रेल्वेस्टेशन जाणाऱ्या रोडच्या बाजूला असलेल्या रेल्वे ट्रॅकजवळ काही इसम दरोडा टाकण्याच्या उद्देशाने थांबले आहेत.माहिती मिळताच पथकाने क्षणाचाही विलंब न करता त्या दिशेने धाव घेतली. रेल्वे ट्रॅकच्या पोलच्या आडोशाला काही संशयित दबा धरून बसलेले दिसले.संशयितांना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी जीवाची पर्वा न करता अंधारातच दरोडेखोरांचा तुफान पाठलाग करून सात जणांना जागीच ताब्यात घेतले, तर दोन इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.सिध्दार्थ संजय जाधव (वय २६,रा. शिरापूर,ता. शिरूर कासार,जि. बीड),सुशील गोपीनाथ पवार (वय ३३,रा.नवघन राजुरी, ता. जि.बीड),विजय बाळासाहेब गायकवाड (वय १९,रा. लव्हळे एक नंबर, ता. माजलगाव,जि.बीड),एकनाथ महादेव मासाळकर (वय ४४, रा. विजयनगर,पाथर्डी, जि. अहिल्यानगर),नितीन शिवाजी धोत्रे (वय ३१,रा.विजयनगर, पाथर्डी,जि.अहिल्यानगर),लखन अर्जुन मुरकुटे (वय २९, रा. मुर्शदपूर, ता. आष्टी, जि. बीड),सोमनाथ कैलास कुसळकर (वय २६, रा. गणपती मंदीराजवळ, आष्टी, ता. आष्टी, जि. बीड) असे पकडलेल्या आरोपीचे नावे आहेत.ताब्यातील आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी पळून गेलेल्यांची नावे ८) अमोल नामदेव धोत्रे (फरार) आणि ९)बाबु धोत्रे (पूर्ण नाव माहित नाही) (फरार) (दोघे रा. इंदिरानगर,पाथर्डी,ता. पाथर्डी,जि.अहिल्यानगर) अशी असल्याचे सांगितले.पकडलेल्या आरोपींची घटना ठिकाणी अंगझडती घेतली असता दरोड्याच्या पूर्वतयारीने आलेल्या या टोळीकडून:
१५००/- रू किंमतीची एक लोखंडी तलवार
१२०००/- रू किंमतीचे तीन मोबाईल
१०००/- रू किंमतीचे दोन लोखंडी चाकू
५०/- रू किंमतीची मिरची पूड
२००/- रू किंमतीचा एक लोखंडी कटर
५००/- रू किंमतीची लोखंडी कटावणी
३००/- रू किंमतीची एक लाकडी गिल्वर
१००/- रू किंमतीची एक नायलॉन दोरी
१३७०/- रू रोख रक्कम
असा एकूण १७,०२०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी पोना/२२९३ राहुल कचरू डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुरनं ६६९/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१० (४), ३१० (५), ३१० (६), ३१३ सह आर्म ॲक्ट ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिर्डी पोलीस ठाणे करीत आहे.
