वेळेत कामे केली असती तर समाधान शिबिरांवर लोखोंचा चुरडा झाला नसता..मनसे नेते अविनाश पवार..पारनेरचे तहसिदार नागरिकांना छळत असताना लोकप्रतिनिधींची तोंड बंद ? पवार
पारनेर | प्रतिनिधी
प्रशासनाने नागरिकांची कामे नियमितपणे आणि वेळेत केली असती, तर शासनाला समाधान शिबिरांवर लाखो रुपयांचा खर्च करण्याची वेळ आली नसती, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश पवार यांनी केली.
पवार म्हणाले की, शासकीय कार्यालयांनी केवळ शिबिरांपुरते काम न करता वर्षभर नागरिकांना तत्पर आणि गुणवत्तापूर्ण सेवा द्यावी. प्रशासनाने समन्वयाने व गतिमान पद्धतीने काम करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र व गरजू नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा.
भाळवणी (पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघ) येथे आयोजित समाधान शिबिरात महसूल विभागासह १७ शासकीय विभागांनी सहभाग घेत नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचे निराकरण केले. यामध्ये जमीन नोंदी दुरुस्ती, ७/१२ उतारे, फेरफार, वारस नोंद, ई-पीक पाहणी, पीएम-किसान तक्रार निवारण, जात व उत्पन्न प्रमाणपत्रांचे वितरण तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत मंजुरी आदेशांचे वितरण करण्यात आले.
लोकसेवा हक्क कायद्यानुसार कृषी, भूमी अभिलेख, आरोग्य, शिक्षण, सहकार, बँकिंग, परिवहन, वन, पंचायत समिती, पोस्ट, नगरपंचायत, महावितरण, महिला व बालविकास आणि पशुसंवर्धन विभागांच्या विविध सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. या शिबिराला पद्मश्री पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार काशिनाथ दाते होते.
मात्र, अशा शिबिरांच्या आयोजनावर लाखो रुपये खर्च होतात, तरीही नागरिकांचे प्रश्न कायम राहतात, असा आरोप अविनाश पवार यांनी केला. प्रशासकीय कार्यालये ही जनतेच्या सेवेसाठी असून प्रत्येक नागरिकाशी आदराने वागून त्याला वेळेत न्याय मिळणे अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पवार यांनी पारनेरच्या तहसीलदार गायत्री सौंदाणे यांच्यावरही टीका करत, “पारनेरच्या तहसीलदार गायत्री सौंदाणे यांना खुर्ची सुटली नाही,” असा आरोप केला. तसेच पारनेर तालुक्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तहसील कार्यालयात एजंटांच्या माध्यमातून आर्थिक चिरी मिरित कामकाज होत असल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही अविनाश पवार यांनी स्पष्ट केले.
