गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-उत्सवाचा जल्लोष,अथांग गर्दी आणि ढोल-ताशांचा गजर…अशा वातावरणात कोणत्याही आपत्कालीन वैद्यकीय प्रसंगी भाविकांचे प्राण वाचवता यावेत,यासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गणेशोत्सवादरम्यान एखाद्या व्यक्तीची अचानक हृदयक्रिया बंद पडल्यास (कार्डिॲक अरेस्ट) तातडीने प्रथमोपचार मिळावेत म्हणून शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळे आणि ढोल-ताशा पथकांसाठी विशेष हृदय-फुफ्फुस पुनर्जीवन (CPR) प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
”उत्सवाचा आनंद द्विगुणित करतानाच प्रत्येकाचा जीव सुरक्षित ठेवणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. योग्य वेळी दिलेला सीपीआर एखाद्याचे प्राण वाचवू शकतो.
प्रशिक्षणाची प्रमुख वैशिष्ट्ये व आयोजक संकल्पना व आयोजन डॉ.संजय घोगरे (जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर),मार्गदर्शन व प्रमुख प्रशिक्षक डॉ.विजय गाणबोटे (ज्येष्ठ भूलतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर),सहकार्य व यजमान प्राचार्य,नर्सिंग स्कूल, अहिल्यानगर,प्रत्येक मंडळ व पथकातून एका ‘देवदूता’ची निवड आवश्यक
उत्सवाच्या काळात गर्दीत नेमकी काय खबरदारी घ्यावी आणि आपत्कालीन स्थितीत वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाला कसे स्थिर ठेवावे,याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण या शिबिरात दिले जाणार आहे.त्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष तसेच ढोल-ताशा पथकांच्या प्रमुखांना आवाहन करण्यात आले आहे की,त्यांनी आपल्या मंडळातून/पथकातून किमान एका जबाबदार सदस्याची या प्रशिक्षणासाठी निवड करावी.
नोंदणीसाठी आवश्यक माहिती:
प्रतिनिधीचे संपूर्ण नाव
संपर्क क्रमांक (मोबाईल नंबर)
संबंधित मंडळाचे किंवा ढोल-ताशा पथकाचे नाव
(सदर तपशील अधिकृत संपर्क ग्रुपवर त्वरित कळवावा.)
आपला एक सजग पुढाकार आणि प्रशिक्षित हात एखाद्या कुटुंबाचा आधार वाचवू शकतात;या जीवनदायी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा रुग्णालयाकडून करण्यात आले आहे.
