गांजाच्या पुड्या बनवणाऱ्या टोळीचा खात्मा..! एलसीबी पथकाची थरारक कारवाई…
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-संगमनेर शहरातील जनतानगर परिसरात राहत्या घरात छुप्या मार्गाने अंमली पदार्थ (गांजा) खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि संगमनेर शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छापा टाकला.या धडक कारवाईत २ लाख ३४ हजार २५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन जणांना रंगेहाथ पकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.त्यानुसार,अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदार गणेश लोंढे,निळकंठ कारखेले,सोमनाथ झांबरे व शिवप्रसाद काकडे यांना अहिल्यानगर व संगमनेर परिसरात रवाना केले होते.
हे पथक संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माहिती घेत असताना,गुप्त बातमीदाराद्वारे बातमी मिळाली की, जनतानगर येथील नम्रता किराणा दुकानासमोर संजय उर्फ संदीप राजू मालुंजकर हा त्याच्या राहत्या घरात सहकाऱ्यांसोबत गांजाच्या लहान-लहान पुड्या तयार करून त्यांची विक्री करत आहे.मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोनि. संतोष मुटकुळे यांनी तात्काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना लेखी रिपोर्ट देऊन संयुक्त कारवाईच्या सूचना दिल्या.त्यानुसार,संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे सपोनि.सचिन वाकडे,पोसई. इम्रान खान,पोसई.श्रीकांत सावंत आणि पोलीस अंमलदार आत्माराम पवार, बाबासाहेब सातपुते,राहुल पांडे,संदीप कोंदे यांच्या पथकाने जनतानगर मधील नमूद ठिकाणी अचानक छापा टाकला.पोलिसांचा अचानक आलेला ताफा पाहून संशयितांची तारांबळ उडाली, मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत संजय उर्फ संदीप राजू मालुंजकर (वय २६,रा. जनतानगर,नम्रता किराणा दुकानासमोर,संगमनेर),आकाश विजय क्षीरसागर (वय २९, हल्ली रा.लक्ष्मीनगर, संगमनेर),प्रविण सखाराम पाचकर (वय २८,हल्ली रा. जनतानगर, संगमनेर) या ३ आरोपींना जागीच अटक केले.ज्युपिटरची डिक्की आणि घरामधून माल जप्त
संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी घर आणि घराबाहेर उभ्या असलेल्या टीव्हीएस ज्युपिटर (MH-17-DK-5129) दुचाकीची बारीक पाहणी केली.तपासा दरम्यान घरात आणि गाडीच्या डिक्कीत दडवून ठेवलेला गांजा आढळून आला.या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७३६/२०२६ अन्वये ‘गुंगीकारक औषधद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा १९८५’ (NDPS Act) चे कलम ८ (क), २०(ब)ii(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत.
