अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांची नियुक्ती
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-“नवा गडी, नवा राज…” हा प्रशासकीय नियम नगर पोलीस दलाला नवा नाही! जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बदलले की, खांदेपालट होणार आणि अनेक पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार,हे ठरलेलेच असते. त्यातच जिल्ह्याची सर्वात पॉवरफुल शाखा असलेल्या जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) प्रमुखाची खुर्ची तर नेहमीच चर्चेत असते.आता हाच पायंडा कायम ठेवत, गेल्याच महिन्यात जिल्ह्याचा पदभार स्वीकारलेले धडक निवारक पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आपला पहिला मोठा ‘धडाका’ दिला आहे.स्थानीक गुन्हे शाखेचे विद्यमान प्रभारी अधिकारी किरणकुमार कबाडी यांची तडकाफडकी थेट शिर्डीच्या साई बाबा मंदिराच्या सुरक्षा विभागात बदली करण्यात आली आहे.तर त्यांच्या जागी शेवगाव पोलीस ठाण्याचे कार्यक्षम प्रभारी अधिकारी संतोष मुटकुळे यांची वर्णी बऱ्याच प्रतीक्षेनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक पदी करण्यात आली आहे.
अहिल्यानगर जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) म्हणजे पोलिसांचा कणा! या जागेवर कोणता अधिकारी बसणार,याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असते.नवे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी महिनाभर जिल्ह्याचा आणि अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा बारकाईने अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी थेट कारवाईचे चक्र फिरवले.एलसीबीचे प्रमुख किरणकुमार कबाडी यांना हटवून त्यांची नियुक्ती शिर्डीच्या व्हीआयपी अशा साई मंदिर सुरक्षा विभागात केली आहे.तर शेवगावमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणारे संतोष मुटकुळे आता नगर जिल्ह्याचा गुन्हेगारीचा आलेख खाली आणण्यासाठी सज्ज झाले आहेत.अहिल्यानगर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. केवळ क्षेत्रफळच नाही,तर राजकीयदृष्ट्याही हा जिल्हा अत्यंत संवेदनशील आणि हाय-व्होल्टेज मानला जातो. प्रत्येक तालुक्यात दिग्गज आणि वजनदार राजकीय नेत्यांचे मोठे वर्चस्व आहे.अशा परिस्थितीत:गुन्हेगारीवर कडक नियंत्रण ठेवणे,
राजकीय दबावाला बळी न पडता कायदा व सुव्यवस्था राखणे अशी कसरत नव्या गुन्हे शाखा प्रमुखाला करावी लागणार आहे.
