लग्नाचे दागिने मागितले अन् घेऊन पळाली..! एकाच वेळी दोन जिवलग मैत्रिणींना गंडा घालणारी ‘ती’ अखेर गजाआड! एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-मैत्रीचा केवळ बहाणा करायचा,समोरच्याचा विश्वास जिंकायचा आणि ऐनवेळी विश्वासघात करून लाखो रुपयांचे दागिने घेऊन पोबारा करायचा…अशाच एका हायप्रोफाईल आणि अट्टल भामट्यांच्या टोळीला येथील एम.आय.डी.सी. पोलिसांनी अत्यंत शिताफीने गजाआड केले आहे.या टोळीकडून पोलिसांनी तब्बल ९ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून,यामध्ये सोन्याचे दागिने आणि महागड्या मोबाईलचा समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार,या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अनिता गणेश नजन हिने नगरमधील दोन महिलांशी अत्यंत जवळीक साधून मैत्री केली होती.यामध्ये सौ. वनिता परसराम नवले (वय ३३ वर्षे, रा.पिंपळे कॉलनी,नागापूर) आणि सौ.अंजुम रफिक तांबोळी (वय ४५ वर्षे, रा. प्रेमभारतीनगर,बोल्हेगाव) या दोन गृहिणींचा समावेश होता.अनिताने या दोन्ही मैत्रिणींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर,”एका लग्नात घालण्यासाठी मला दागिन्यांची गरज आहे,” असे खोटे कारण सांगून तिने वनिता नवले यांच्याकडून साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि अंजुम तांबोळी यांच्याकडून अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने मागून घेतले.मात्र, दागिने हातात पडताच अनिताने ते परत न करता दोन्ही मैत्रिणींचा विश्वासघात केला आणि ती दागिने घेऊन फरार झाली.
याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलांनी धाव घेतली. एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात २४ मे २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स.पो.नि.श्री.हेमंत थोरात यांनी तपासासाठी तात्काळ पथके रवाना केली.आरोपी अत्यंत हुशार होते. गुन्हा केल्यानंतर त्यांनी आपले मूळ ठाणे सोडले आणि ओळख पटू नये म्हणून सतत मोबाईल फोन तसेच विविध कंपन्यांची सिमकार्ड बदलून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला.त्यांचा कोणताही सुगावा लागत नव्हता.मात्र,पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) आणि गोपनीय माहितीच्या आधारे दिवस-रात्र मेहनत घेतली.अखेर पोलिसांनी या टोळीचा शोध लावून ४ जणांना बेड्या ठोकल्या.अनिता गणेश नजन (वय ४० वर्षे, रा. गणेश पार्क कॉलनी,बोल्हेगाव फाटा),वैष्णवी गणेश नजन (वय २२ वर्षे,रा.बोल्हेगाव फाटा),गणेश परसराम नजन (वय ४८ वर्षे,रा.बोल्हेगाव फाटा),बन्यामीन जोसेफ बोरुडे (वय २६ वर्षे, रा.कर्जने खारे,ता.जि.अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.लाखोंचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपींकडून कसून चौकशी केली असता,त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून
८,४०,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने,७५,०००/- रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे ५ महागडे मोबाईल आणि सिमकार्ड्स असा एकूण ९,१५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेश अरुण रोहोकले हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्माका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (नगर ग्रामीण) श्री.शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि.हेमंत थोरात,सफौ. राकेश खेडकर,पोहेकॉ.शैलेश रोहोकले,पोहेकॉ.देविदास खेडकर,पोकॉ.दिपक फुंदे, पोकॉ.नवनाथ दहिफळे,पोकॉ. किशोर जाधव,मपोशि.पुनम नरसाळे,तांत्रिक मदत पोलीस अंमलदार राहुल गुंडू आणि पोकॉ.अरुण सांगळे यांनी केली आहे.पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
