दारात रबरी कृत्रिम लिंग टाकून महिलेचा विनयभंग..तोफखाना पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या..एक अल्पवयीन मुलगाही सामील!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-मध्यरात्रीच्या शांततेत अचानक दारात काहीतरी पडल्याचा आवाज होतो… महिला घाबरून दरवाजा उघडते,तर समोर एक बॉक्स दिसतो. कुतूहलापोटी कुटुंबियांनी तो बॉक्स उघडला आणि समोर जे दिसलं,त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली! स्त्री लज्जेला काळिमा फासणारा आणि अत्यंत विकृत असा हा प्रकार अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. एका महिलेच्या घरासमोर चक्क रबरी मानवी कृत्रिम लिंग (Adult Toy) फेकून तिचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या विकृत कृत्याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य सूत्रधारासह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील सिद्धार्थनगर भागात राहणारी पीडित महिला ही १० जून २०२६ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास आपल्या पती आणि मुलासह घरात झोपली होती.त्यानंतर ११ जूनच्या मध्यरात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास तिच्या घरासमोरील ओट्यावर काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला.
काहीतरी अघटित घडल्याच्या संशयावरून पीडित महिलेने तात्काळ घराचा दरवाजा उघडून पाहिले.तेंव्हा तिला दारात एक कागदी मोरपंखी रंगाचा बॉक्स पडलेला दिसला.महिलेने घरातील इतर सदस्यांच्या मदतीने तो बॉक्स उघडून पाहिला असता,त्यामध्ये एक रबरी मानवी कृत्रिम लिंग आढळले.
या प्रकारामुळे पीडित महिला प्रचंड हादरली आणि समाजात तिची मोठी लज्जा उत्पन्न झाली.या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेने तात्काळ पोलीस ठाणे गाठले. १३ जून २०२६ रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा रजि. नं. ४७९/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७९ आणि ३(५) प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.पीडितेच्या तक्रारीनंतर तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले.हा गुन्हा स्त्री अत्याचाराशी संबंधित असल्याने त्यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली.तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सिद्धार्थनगर,म्युन्सीपल कॉलनी येथून मुख्य आरोपी विनोद मधुकर त्रिभुवन (वय ४३ वर्षे) याला ताब्यात घेतले.पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी विनोद याने आपला गुन्हा कबूल केला.धक्कादायक बाब म्हणजे या विकृत कृत्यात त्याचे इतर दोन साथीदारही सामील होते. पोलिसांनी त्याचे साथीदार हर्ष सुनील शेलार (वय १८ वर्षे) आणि एका विधीसंघर्षीत (अल्पवयीन) बालकाला देखील ताब्यात घेतले आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार गोपीनाथ गोर्डे करत आहेत.
सदरची धडक कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे नगर शहर विभाग यांच्या सूचनेनुसार तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, अंमलदार नितीन उगलमुगले, अरुण गांगुर्डे,भानुदास खेडकर, अब्दुलकादर इनामदार,सुधीर खाडे,सूरज वाबळे,सुमित गवळी, अविनाश बर्डे,सतिष त्रिभुवन, सुजय हिवाळे,भागवत बांगर, सतिष शिंदे,शाकीर सय्यद, बाळासाहेब भापसे,कपिल गायकवाड,महिला पोलीस नाईक जिजा खुडे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल कल्पना अवसरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.या धडक कारवाईमुळे परिसरातून पोलिसांचे कौतुक होत आहे.
