शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे आमदार अक्षय कर्डिले यांच्या हस्ते जल्लोषात स्वागत..आजची ही चिमुकली मुले उद्याचा भारत घडविणारी पिढी..शिक्षण हेच यशाचे आणि प्रगतीचे सर्वात प्रभावी साधन आहे आमदार अक्षय कर्डिले
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठीआणि शिक्षणाविषयी गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने राहुरी मतदारसंघाचे आमदार अक्षय कर्डिले यांनी जिल्हापरिषद मराठी शाळा, बुऱ्हानगर येथे भेट देत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले.शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रथमच शाळेत प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना पुस्तके,वह्या व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच फुलांची उधळण करून आणि टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शाळा परिसरात आनंददायी आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील निरागस आनंद आणि पालकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. शिक्षणाच्या प्रवासाची सुरुवात सकारात्मक वातावरणात व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार अक्षय कर्डिले म्हणाले, आजची ही चिमुकली मुले उद्याचा भारत घडविणारी पिढी आहे. शिक्षण हेच यशाचे आणि प्रगतीचे सर्वात प्रभावी साधन आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने मोठी स्वप्ने पाहावीत, मेहनतीने अभ्यास करावा आणि आपल्या आई-वडिलांसह गावाचे नाव उज्ज्वल करावे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत. शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
