सोशल मीडिया अॅडमिन्स आणि युजर्ससाठी पोलिसांची महत्वाची नियमावली वाचा सविस्तर..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरात आगामी मोहरम उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा, यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन्ससाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि कडक कायदेशीर नोटीस जारी केली आहे.भारतीय नागरीक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६८ अन्वये ही नोटीस बजावण्यात आली असून,दि.१७ जून २०२६ ते २६ जून २०२६ या मोहरम उत्सवाच्या कालावधीत सोशल मीडियावरील हालचालींवर पोलीस बारीक लक्ष ठेवून असणार आहेत.पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची तेढ किंवा वाद निर्माण होऊ नये म्हणून खालील ४ प्रमुख नियम जाहीर केले आहेत:
१.आक्षेपार्ह पोस्टवर बंदी: व्हॉट्सअॅप,इंस्टाग्राम, फेसबुक किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह,वादग्रस्त किंवा चिथावणीखोर मजकूर पोस्ट अथवा प्रसारित करू नये.
२.जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवर बंदी: दोन गटात,समाजात किंवा जाती-धर्मामध्ये द्वेष निर्माण होईल अशा पद्धतीचे कोणतेही मेसेज शेअर करू नयेत.
३.अफवा पसरवण्यापासून रोखणे: आपल्या ग्रुपवर कोणतीही अफवा किंवा समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर येणार नाही,याची संपूर्ण जबाबदारी ग्रुप अॅडमिनची असेल.
४.आक्षेपार्ह फोटोंना आळा: जातीय सलोखा बिघडवणारे कोणतेही फोटो, ग्राफिक्स किंवा व्हिडिओ प्रसारित करू नयेत.
⚠️ दुर्लक्ष केल्यास थेट न्यायालयात होणार कारवाई!
कोतवाली पोलिसातर्फे स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, जर कोणत्याही ग्रुप अॅडमिनने किंवा ऑपरेटरने या सूचनांकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळे शहरात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला,तर त्यासाठी सर्वस्वी ग्रुप अॅडमिनला जबाबदार धरले जाईल.प्रचलित कायद्यानुसार त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि हीच नोटीस न्यायालयात सबळ पुरावा म्हणून सादर केली जाईल,असा सज्जड दम पोलिसांनी दिला आहे.
त्यामुळे पुढील १० दिवस अहिल्यानगरमधील नागरिकांनी आणि विशेषतः व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन्सनी सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करताना अत्यंत सतर्क राहणे गरजेचे आहे.
