अहिल्यानगर..भरदिवसा महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत मारण्याचा प्रयत्न..धक्कादायक कारण आले समोर
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील झोपडपट्टी भागात एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार समोर आला आहे. “तू झोपडपट्टीतील लोकांना आमच्या विरोधात फितवत आहे, तुझा काटाच काढतो,” अशी धमकी देत एका महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी तत्परता दाखवत दोन महिला आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.या घटनेमुळे संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,ही घटना दि.१७ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास घडली.फिर्यादी रेणुका बांगर भोसले (रा. झोपडपट्टी काष्टी,ता.श्रीगोंदा) या आपल्या घरासमोर असताना,आरोपींनी जुन्या वादाचा राग मनात धरून त्यांना गाठले. “तू आमच्या विरोधात लोकांना भडकवतेस, आज तुझा गेमच करतो,” असे म्हणत आरोपींनी सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल रेणुका यांच्या अंगावर ओतले. काही समजण्याच्या आतच आरोपींनी माचीसची काडी पेटवून त्यांच्या अंगावर फेकली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या जीवघेण्या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाल्या आहेत.याप्रकरणी पीडित महिला रेणुका भोसले यांच्या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६१८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, १२७(२), १८९(२), १९०, १९१(३), आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
सुप्रिया शेंड्या काळे (वय ३० वर्षे),छम्मा शेंड्या काळे (वय ३५ वर्षे) (दोन्ही रा.झोपडपट्टी काष्टी,ता.श्रीगोंदा) या दोन्ही महिला आरोपींना पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.सदरची कौतुकास्पद कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे तसेच श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर,पो.उप.निरी.भगवान गांगर्डे,पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी वाबळे, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल जमुना बजंगे,पोलीस कॉन्स्टेबल संदीप आजबे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल राणी व्यवहारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
