गरिबांचा घास पळवणाऱ्या रेशन दुकानदारांची आता खैर नाही..! स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई सरकारी गहू व तांदळाचा लाखो रुपयांचा साठा येथून जप्त..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने एका मोठ्या रेशनिंगच्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश केला आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशाने रात्रीच्या सुमारास टाकलेल्या धडक छाप्यामध्ये तब्बल १२,८५० किलो (१२ टन पेक्षा जास्त) शासकीय गहू आणि तांदळाचा साठा जप्त करण्यात आला आहे.या कारवाईत दोन वाहनांसह एकूण १२,०२,७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, एका २६ वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले आहेत.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना १९ जून २०२६ च्या रात्री एक अत्यंत गोपनीय आणि महत्त्वाची माहिती मिळाली.सोनगाव सात्रळ गावातील ‘साई बालाजी फर्निचर’ च्या शेजारी असलेल्या एका पत्र्याच्या गोदामात रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार करण्यासाठी मोठा साठा दडवून ठेवण्यात आल्याचे समजले.माहिती मिळताच वेळ न घालवता पो.नि.संतोष मुटकुळे यांनी तातडीने चक्र फिरवली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे,पोलीस अंमलदार सुनील पवार,रिचर्ड गायकवाड आणि रमीजराजा अतार यांचे एक विशेष पथक तयार केले. पथकाला आवश्यक त्या सूचना देऊन मध्यरात्रीच कारवाईसाठी रवाना करण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार,गुन्हे शाखेच्या पथकाने सोनगाव सात्रळ शिवारातील त्या संशयास्पद गोदामाची नाकेबंदी केली.अचानक पडलेल्या या छाप्यामुळे गोदामात बसलेल्या एका तरुणाची पाचावर धारण बसली.पोलिसांनी त्याला जागीच ताब्यात घेतले.चौकशी केली असता त्याने आपले नाव यासिर सादिक तांबोळी (वय २६,रा. सोनगाव सात्रळ,ता.राहुरी,जि. अहिल्यानगर) असे सांगितले.
संशयित आरोपी यासिर तांबोळी याच्या समक्ष पोलिसांनी संपूर्ण गोदामाची कसून झडती घेतली. तेव्हा पोलिसांचेही डोळे पांढरे झाले.
गोदामात रेशनिंगच्या धान्याने गच्च भरलेल्या शेकडो गोण्या आणि धान्य वाहतुकीसाठी सज्ज असलेली दोन वाहने उभी होती.पोलिसांनी जेव्हा धान्याबाबत विचारपूस केली,तेव्हा आरोपीने आसपासच्या रेशन दुकानांमधून हा सरकारी गहू आणि तांदूळ काळ्याबाजाराने (तस्करीसाठी) खरेदी केल्याची कबुली दिली.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी यासिर तांबोळी याला मुद्देमालासह राहुरी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे. याप्रकरणी आरोपी विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७१३/२०२६,जीवनावश्यक वस्तू अधिनियम (Essential Commodities Act) कलम ३ आणि ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रेशनिंगच्या या काळ्याबाजाराचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत पसरले आहेत आणि यात कोणते रेशन दुकानदार सामील आहेत,याचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक अनंत सालगुडे, अंमलदार सुनील पवार,रिचर्ड गायकवाड आणि रमीजराजा अतार यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या कामगिरीमुळे जिल्ह्यातील रेशन माफियांमध्ये पुरती खळबळ उडाली आहे.
