मोठ्या नफ्याचे आमिष भोवले..! सैनिकाला बसला तब्बल ६ लाखांचा ऑनलाईन फटका..केरळच्या ‘त्या’ तिघांनी कसा रचला डाव? वाचा सविस्तर
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या एका लष्करी जवानालाच सायबर भामट्यांनी आपल्या जाळ्यात ओढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन व्यवसायात गुंतवणूक केल्यास प्रचंड नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून या जवानाची तब्बल ५ लाख ९८ हजार ९९९ रुपयांची (जवळपास ६ लाख) फसवणूक करण्यात आली आहे.या खळबळजनक प्रकरणाची नोंद अहिल्यानगर येथील सायबर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार,राजेश गुर्जर (वय ३०, रा.व्यवसाय-नोकरी) असे फसवणूक झालेल्या लष्करी जवानाचे नाव आहे.ते सध्या अहिल्यानगर येथील लष्करी मुख्यालयात कार्यरत आहेत. या प्रकरणात विनीत व्ही. नवीन एस.आणि इलयराजा ए. (सर्व राहणार केरळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
या तिघांनी संगनमत करून फिर्यादी राजेश गुर्जर यांच्याशी संपर्क साधला. “आमच्या व्यवसायात पैसे गुंतवा, तुम्हाला घरबसल्या मोठा फायदा होईल,” असे खोटे आश्वासन त्यांनी जवानाला दिले.आरोपींच्या या गोड बोलण्याला बळी पडून,गुर्जर यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये तब्बल ५ लाख ९८ हजार ९९९ रुपये ऑनलाईन माध्यमातून गुंतवले.पैसे गुंतवून काही दिवस उलटले,मात्र राजेश गुर्जर यांना कोणताही परतावा (नफा) मिळाला नाही.वारंवार विचारणा करूनही पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे जवानाच्या लक्षात आले.त्यांनी तातडीने आरोपींकडे स्वतःचे मूळ पैसे तरी परत द्यावेत,अशी मागणी केली.मात्र,आरोपींनी पैसे देण्यास साफ टाळाटाळ करत हात वर केले.आपली फसवणूक झाल्याचे समजताच फिर्यादी जवानाने सुरुवातीला राजस्थान येथील पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली होती.गुन्हा घडलेले ठिकाण अहिल्यानगर असल्याने,राजस्थान पोलिसांनी तेथून शून्य क्रमांकाचा प्रथम माहिती अहवाल (Zero FIR) तयार करून हे प्रकरण अहिल्यानगर पोलिसांकडे वर्ग केले.त्यानुसार,अहिल्यानगर सायबर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
पोलीस प्रशासनाचे आवाहन: नागरिकांनी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन कोणत्याही अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरून किंवा भरघोस नफ्याच्या आमिषाला बळी पडून मोठ्या रकमा गुंतवू नयेत.कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनी किंवा व्यक्तीची खात्री करून घ्यावी.
