बेलापूरमध्ये बिबट्याची दहशत! रात्री घरात घुसून शेळी ठार;कुत्र्यालाही ओढून नेले,अंधाऱ्या रस्त्यामुळे भीती वाढली..
बेलापूर (प्रतिनिधी):-ऐनतपूर येथील बांगल वस्ती रोड परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराच्या परिसरात घुसून सोमनाथ वसंत राशीनकर यांच्या शेळीवर हल्ला केला.या हल्ल्यात शेळी ठार झाली,तर एका कुत्र्यालाही बिबट्याने घेऊन गेल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेनंतर बांगल वस्ती रोड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षेबाबतही पालकांमध्ये चिंता वाढली आहे.विशेष म्हणजे या मार्गावर पथदिव्यांची सुविधा नसल्याने रात्रीच्या वेळी परिसरात मोठा अंधार असतो.त्यामुळे बिबट्याचा वावर नागरिकांसाठी अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान,गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतीने पथदिवे बसविण्याची तोंडी मागणी करण्यात आली आहे. मात्र,अद्याप याबाबत लेखी निवेदन देण्यात आलेले नाही.तसेच वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात,अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.नागरिकांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार करून ग्रामपंचायत आणि वनविभागाने तातडीने दखल घ्यावी,अशी अपेक्षा परिसरातून व्यक्त होत आहे.
