माढ्याची लेक पोहोचली प्रदेश पातळीवर! समाजसेविका मायाताई माने यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या ‘पश्चिम महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख’ पदी नियुक्ती..
माढा (विशेष प्रतिनिधी):-ग्रामीण भागातील तळागाळातील प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या,महिला सक्षमीकरण आणि संघटना बांधणीत मोलाचे योगदान देणाऱ्या माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या मायाताई अर्जुन माने यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणीत ‘पश्चिम महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख’ पदी नुकतीच अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.या निवडीमुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असून,माढा तालुक्याच्या राजकीय व सामाजिक वर्तुळातून माने यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.मुंबई येथे पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात माया माने यांना या निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले.हा सोहळा भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आ.योगेश टिळेकर यांच्या शुभहस्ते पार पडला.या महत्त्वपूर्ण सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये प्रामुख्याने आ.गोपीचंद पडळकर,आ.माधुरीताई नाईक,आ.निरंजन डावखरे,आ.योगेश सागर,भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांच्यासह भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश आणि जिल्हा पातळीवरील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.माया माने यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विठ्ठलवाडी परिसरासह माढा तालुक्यात महिलांचे संघटन,विविध सामाजिक उपक्रम, गोरगरिबांचे प्रश्न आणि जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे.पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात आणि ओबीसी समाजाचे संघटन मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.त्यांच्या या निस्वार्थ समाजसेवेची आणि संघटनात्मक कौशल्याची दखल घेऊनच पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या खांद्यावर पश्चिम महाराष्ट्राची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.माया माने यांच्या निवडीची बातमी समजताच भाजपा सोलापूर जिल्हा पश्चिम आणि माढा पूर्व मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,तसेच समस्त विठ्ठलवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.एका कर्तृत्ववान महिला कार्यकर्त्याला थेट प्रदेश पातळीवर मिळालेल्या या संधीमुळे संपूर्ण तालुक्याचा मान वाढला असल्याची भावना व्यक्त होत असून राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
