अंध मावशीच्या डोळ्यांतील अश्रू पुसले;’मनसे’ च्या पुढाकाराने बंद रेशन पुन्हा सुरू,सरपंचांनी दिला निवाऱ्याचा आधार..
पारनेर (प्रतिनिधी):-प्रशासकीय अनास्थेमुळे तहसील कार्यालयात हेळसांड झालेल्या करंडी येथील दिव्यांग, अंध वयोवृद्ध महिला श्रीमती हिराबाई धृपद भालेकर यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तातडीने पावले उचलत त्यांना मोठा दिलासा मिळवून दिला आहे. मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या प्रेरणेने पारनेर मनसेच्या शिष्टमंडळाने थेट भालेकर यांच्या घरी जाऊन त्यांचे बंद असलेले रेशन पूर्ववत सुरू करून दिले.काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयात ताटकळत बसलेल्या हिराबाई भालेकर यांची व्यथा समोर आली होती. या घटनेची गंभीर दखल घेत मनसे पारनेर तालुकाध्यक्ष अविनाश पवार, तालुका सचिव नारायण नरवडे,शहराध्यक्ष सतीश म्हस्के आणि विशाल गवळी यांच्या शिष्टमंडळाने करंडी गावचे सरपंच भास्करराव गव्हाणे यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली.
मनसेच्या पाठपुराव्यानंतर स्वस्त धान्य दुकानदार बाबाजी ठाणगे यांच्यामार्फत हिराबाई भालेकर, त्यांची मुलगी, नात गौरी भालेकर आणि चिमुकल्या बाळाच्या स्वाधीन धान्याचे वाटप करण्यात आले. रेशनचे धान्य हातात मिळताच अंध मावशी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले.या वेळी करंडी गावचे सरपंच भास्करराव गव्हाणे यांनी संवेदनशीलता दाखवत मोठा निर्णय घेतला. जोपर्यंत हिराबाई भालेकर यांचे हक्काचे घरकुल पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांच्या निवाऱ्यासाठी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या खोलीची तात्पुरती व्यवस्था करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सरपंचांच्या या सामाजिक बांधिलकीचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.सत्ता नसतानाही लोकप्रतिनिधींना लाजवेल अशी तत्परता दाखवून सामान्यांच्या प्रश्नांवर धावून जाण्याची मनसेची भूमिका या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. मनसेच्या या तत्पर न्याय मिळवून देण्याच्या कार्यपद्धतीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
