३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेचा भावुक समारोप प्रा.किरण इंगळे यांचा सपत्नीक जंगी सत्कार..!दादासाहेब रुपवते कनिष्ठ महाविद्यालयात सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न..
अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी):-बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्यांना केवळ पुस्तकी विद्यार्थी न समजता देशाचे सुजाण आणि सक्षम भावी नागरिक म्हणून घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला,” असे भावुक प्रतिपादन राज्यशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक किरण इंगळे यांनी केले.बहुजन शिक्षण संघ संचलित दादासाहेब रुपवते विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.किरण इंगळे यांच्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक अध्यापन सेवेचा गौरवपूर्ण सेवापूर्ती सोहळा विद्यालयाच्या प्रांगणात नुकताच पार पडला.यावेळी विद्यालयाच्या वतीने प्रा.इंगळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रेखाताई इंगळे यांचा शाल, फेटा,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक भावपूर्ण सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना प्रा.किरण इंगळे अत्यंत भावुक झाले.ते म्हणाले, “३१ वर्षांपूर्वी महाविद्यालयात गुणवत्ता सिद्ध करून रुजू झालो.राज्यशास्त्र विषयाचा शिक्षक असल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा प्रसार व्याख्यानांतून करण्याची संधी संस्थेने दिली.
आज जेव्हा अनेक उच्च पदांवर कार्यरत असलेले माझे माजी विद्यार्थी भेटतात आणि ‘सर,तुम्ही शिकवलेले राज्यशास्त्र आजही जीवनात दिशा दाखवते’ असे अभिमानाने सांगतात,तेव्हा शिक्षक म्हणून केलेल्या कार्याचे सार्थक वाटते. लोकशाही ही केवळ शासनप्रणाली नसून ती जगण्याची एक समृद्ध पद्धत आहे,हेच मूल्य मी आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या मनात रुजवले.समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष भास्करराव जऱ्हाड होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रमोद सूर्यवंशी यांनी केले.
याप्रसंगी बहुजन शिक्षण संघाचे रजिस्ट्रार प्रा.रवींद्र एडके,माजी रजिस्ट्रार प्रा.व्ही. एम.बैचे,निवृत्त नायब तहसीलदार शशिकांत दळवी, पर्यवेक्षक प्रा.जयंत गायकवाड, प्रा.राहुल खंडीझोड,देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे संपादक महेश भोसले,प्रा.भीमराव पगारे, संजय पाबळकर,नेहा इंगळे, सदाशिव पवार,आदिनाथ मोरे, दीपक ठाणगे आणि ज्ञानदेव कोरडे यांनी मनोगत व्यक्त करून प्रा.इंगळे यांच्या कार्यशैलीचा गौरव करत त्यांना पुढील निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात माजी विद्यार्थी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या वतीनेही प्रा. इंगळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.समारंभानंतर सर्व उपस्थित मान्यवर, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सोपान कदम,प्रा.महेंद्र कदम,प्रा.संदीप पाखरे,प्रा. संजीवन साळवे,कलाशिक्षक अजय भिंगारदिवे,प्रा.शाम यादव,भीमराव जाधव,संघर्ष साळवे,राजू ससाने,महेंद्र शिंदे, सुवर्णा खोसे,रूपाली झाडे, अनिता हांगेकर,सुनीता पटेकर,रेखा गायकवाड आणि मंदा साठे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सोपान कदम यांनी केले.
