गावठी कट्टा अन् गळ्याला चाकू..!अडीच लाखांची खंडणी उकळणारा कुख्यात गुन्हेगार अखेर LCB च्या जाळ्यात..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-गळ्याला धारदार चाकू लावून आणि गावठी कट्ट्याचा धाक दाखवून भररस्त्यात दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे.दि.१२ ऑगस्ट रोजी पाथर्डी येथील राहुल रामराव गर्जे हे घरी जात असताना,आरोपी सुधीर संभाजी शिरसाठ (वय ३०,रा. आसरानगर,पाथर्डी) आणि त्याच्या साथीदारांनी त्यांची गाडी अडवली.गर्जे यांच्या गळ्याला चाकू लावून आणि गावठी कट्ट्याचा धाक दाखवून तब्बल अडीच लाख रुपयांची खंडणी मागितली, तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने हिसकावून पसार झाले.याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गंभीर कलमांन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला होता.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदिप दरवडे,अंमलदार विष्णु भागवत, सोमनाथ झांबरे,अशोक लिपणे,फुरकान शेख,किशोर शिरसाठ आणि आजिनाथ पाखरे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदाराच्या मदतीने आरोपीचा माग काढला.आरोपी सुधीर शिरसाठ हा शहरातील हॉटेल ‘सगम’ येथे लपून बसल्याची पक्की माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून त्याला बेड्या ठोकल्या.ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी पाथर्डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पोलीस आता त्याच्या इतर साथीदारांचा कसून शोध घेत आहेत.
