शहरातील मध्यवस्तीत बेकायदेशीररीत्या सुगंधीत तंबाखू आणि विषारी मावा बनवणाऱ्या ‘त्या’ अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहरातील मध्यवस्तीत बेकायदेशीररीत्या सुगंधीत तंबाखू आणि विषारी मावा बनवणाऱ्या दोन अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने एकाच वेळी छापा टाकून मोठा भांडाफोड केला आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या थेट आदेशानंतर एलसीबीच्या पथकाने ही धडक कारवाई करत तब्बल ४ लाख ३९ हजार ४८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथकांनी शहरात सापळा रचून दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले.या कारवाईत हायटेक इलेक्ट्रिक मशिन्ससह मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित साठा हस्तगत करण्यात आला.पहिल्या कारवाईत (तोफखाना गु.र.नं. 738/2026): बोल्हेगाव परिसरातील अड्ड्यावर छापा टाकून इलेक्ट्रिक मशीन,वजन काटा, ९ किलो सुगंधीत तंबाखू व ३ किलो तयार मावा असा ६६,९८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दुसऱ्या कारवाईत (तोफखाना गु.र.नं. 739/2026) दुसऱ्या अड्ड्यावरून मावा बनवण्याचे आधुनिक इलेक्ट्रिक मशीन, सुपारी बारीक करण्याचे कटर, ४० किलो तयार मावा, १७ किलो सुगंधीत तंबाखू, १२० किलो अख्खी सुपारी आणि २५ किलो सुपारीचा चुरा असा तब्बल ३,७२,५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
आदेश किसन भिंगारदिवे (वय २३, रा. भिंगारदिवे मळा, बोल्हेगाव),कृष्णा यादव वैराळ (वय ३४, रा. सर्जेपुरा,मोसीम रफिक शेख (वय ३८,रा. मुकुंदनगर,वसीम रफिक शेख (वय ३२, रा.मुकुंदनगर,राकेश सब्बन (रा.दातरंगे मळा,फरार असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.तोफखाना पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ व ३(५) अन्वये दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.ही धडक कामगिरी पोलीस अंमलदार अरूण गांगुर्डे, विकास साळवे,गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे,संदीप पवार,विजय ठोंबरे,अतुल लोटके,शाहीद शेख,अभिजीत आरकल,सतीष भवर तसेच महिला पोलीस अंमलदार चिमा काळे व सुनिता पवार यांनी पार पाडली.शहरात अवैध गुटखा व नशिले पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे धाबे या कारवाईमुळे दणाणले आहेत.
