अखेर ‘त्या’ पोलीस निरीक्षकाचा कबुलीचा स्फोटक ऑडिओ समोर..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शेवगाव दंगल प्रकरणाला आता एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक वळण मिळाले आहे.वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांना एका मोठ्या षडयंत्राचा भाग म्हणून दंगलीच्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा सनसनाटी दावा समोर आला आहे.विशेष म्हणजे,एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्यानेच प्राध्यापक किसन चव्हाण यांना या प्रकरणात कसे गोवले,याची थेट कबुली दिल्याचा दावा करणारी ऑडिओ क्लिप समोर आल्याने पोलीस दलासह राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.शेवगाव दंगलीच्या वेळी प्राध्यापक किसन चव्हाण यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.मात्र,हा संपूर्ण प्रकार सूडबुद्धीतून आणि जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप आज शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्राध्यापक किसन चव्हाण यांनी केला.
ते म्हणाले की जिल्हा व सत्र न्यायालयात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाद मागितली होती.या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने थेट चौकशीचे आदेश दिले होते.त्यानुसार सध्या पोलीस उपअधीक्षक (DySP) दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाची अत्यंत गोपनीय आणि सखोल चौकशी सुरू आहे.पाथर्डी पोलीस ठाण्यात एका आदिवासी महिलेच्या तक्रारीसाठी गेलेल्या दलित कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता.या घटनेनंतर तीव्र पडसाद उमटले आणि मोठे जनआंदोलन उभे राहिले.याच आंदोलनाच्या दरम्यान पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी पत्रकारांशी बोलताना एक धक्कादायक गौप्यस्फोट केल्याचा आरोप आहे.शेवगाव दंगल प्रकरणात प्राध्यापक किसन चव्हाण यांचा काहीही संबंध नसताना त्यांना जाणीवपूर्वक कसे अडकवण्यात आले,याची धक्कादायक कबुली पोलीस निरीक्षक पुजारी यांनी दिल्याचे बोलले जात आहे.या कथित संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग वंचित बहुजन आघाडीच्या हाती लागली असून,त्यांनी हा अत्यंत स्फोटक पुरावा थेट डीवायएसपी दर्जाच्या चौकशी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे.खुद्द पोलीस अधिकाऱ्याच्या या कबुलीमुळे खाकी वर्दीतील अंतर्गत कटकारस्थान आणि राजकीय दबावातून झालेली कारवाई उघडी पडल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.या ऑडिओ क्लिपमुळे आता पोलीस यंत्रणेत नेमके काय शिजत होते,प्राध्यापक किसन चव्हाण यांना अडकवण्यामागे कोणाचा अदृश्य हात होता आणि आता या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार,याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
