सावधान! रस्त्यावर अनोळखी कारमधून लिफ्ट घेताय? ‘या’ भामट्यांचा धक्कादायक कारनामा वाचून बसेल धक्का!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-महामार्गावर किंवा रस्त्यावर थांबून अनोळखी वाहनांमधून लिफ्ट मागणाऱ्यांसाठी ही अत्यंत धक्कादायक आणि डोळे उघडवणारी बातमी आहे. कारमधून मोफत लिफ्ट देण्याचा बहाणा करायचा आणि रस्त्यात वृद्ध महिलांना धमकावून त्यांचे दागिने लुटून चालत्या गाडीतून फेकून द्यायचे,असा थरारक प्रताप करणाऱ्या एका टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.नागलवाडी (ता.कर्जत) येथील ६५ वर्षीय द्वारकाबाई उत्तम डाडर या २० ऑगस्ट रोजी रस्त्यावर उभ्या असताना एका कारमधील महिला आणि पुरुषाने त्यांना मिरजगाव येथे सोडण्याचा बहाणा केला.गाडीत बसवल्यानंतर निर्जनस्थळी नेऊन जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून गाडीबाहेर ढकलून दिले.याप्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांच्या मदतीने आरोपींचा माग काढला.तारकपूर बसस्थानक परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असलेली आरोपी कोमल भाऊसाहेब नन्नवरे (वय ३०,रा.डावरवाडी,ता.पैठण,जि.छत्रपती संभाजीनगर) हिला पोलिसांनी आधी ताब्यात घेतले.तिच्या माहितीवरून सोलापूर रोडने शहरात येणारा मुख्य साथीदार लक्ष्मण मोहन जामदार (वय २६,रा. कोकणगाव,ता.श्रीगोंदा,जि. अहिल्यानगर) याला कोंबडीवाला मळा येथे सापळा रचून विनाक्रमांकाच्या हुंदाई ‘ऑरा’ कारसह पकडण्यात आले.
आरोपींनी मिरजगावसह पाथर्डी-अहिल्यानगर मार्गावरही अशाच प्रकारे वृद्ध महिलेला लुटल्याची कबुली दिली.पोलिसांनी आरोपींकडून ८ लाख ,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार फुरकान शेख,श्यामसुंदर जाधव, किशोर शिरसाठ,भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर,मनोज साखरे,जालींदर साखरे,प्रशांत राठोड आणि ज्योती शिंदे यांच्या पथकाने केली. आरोपींना पुढील कारवाईसाठी मिरजगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
