सरकारी आवारात झाडांवर चालली कुऱ्हाड;वन विभागाकडून हात वर,आता नगर पंचायतीच्या भूमिकेकडे लक्ष..
पारनेर (प्रतिनिधी):-पारनेर येथील भूमि अभिलेख कार्यालयाच्या आवारात झालेली सीताफळ, रामफळासह इतर मौल्यवान झाडांची विनापरवाना तोड सध्या प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.या बेकायदेशीर वृक्षतोडी विरोधात मनसे तालुकाध्यक्ष अविनाश मुरलीधर पवार यांनी वन विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली होती.मात्र,वन विभागाने हे क्षेत्र नगरपंचायत हद्दीत येत असल्याचे कारण पुढे करत कारवाईची जबाबदारी थेट पारनेर नगर पंचायतीच्या कोर्टात ढकलली आहे.प्रकरणाची पार्श्वभूमी व वनविभागाचे स्पष्टीकरण पारनेर भूमि अभिलेख कार्यालयातील झाडांची विनापरवाना कत्तल करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी,अशी लेखी मागणी मनसेने २१ ऑगस्ट रोजी वन विभागाकडे केली होती.यावर वनपरिक्षेत्र अधिकारी जी.व्ही. धाडे यांनी (जा.क्र.कक्ष-१/गुन्हे/७३०/सन २०२६-२७) लेखी उत्तर देत स्पष्ट केले की, हे कार्यालय पारनेर नगर पंचायत हद्दीत येते.
नागरी क्षेत्रातील वृक्षतोड अथवा त्यासंबंधीची कारवाई करण्याचे अधिकार नगर पंचायतीच्या वृक्ष अधिकाऱ्यांकडे असल्याने वन विभाग यावर थेट कारवाई करू शकत नाही;त्यामुळे संबंधित विभागाकडे दाद मागावी.वनविभागाच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत मनसे तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांनी प्रशासकीय ढिसाळपणावर निशाणा साधला.”सरकारी कार्यालयाच्या आवारातच जर अशा प्रकारे राजरोस वृक्षतोड होत असेल आणि प्रमुख यंत्रणा हात झटकून एकमेकांकडे बोट दाखवत असतील, तर सर्वसामान्यांनी न्यायासाठी कुठे जायचे?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.दरम्यान,ही तक्रार आता पारनेर नगर पंचायतीकडे अधिकृतपणे वर्ग करण्यात आली असून, नगर पंचायत प्रशासन संबंधितांवर काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
