अहिल्यानगर हादरले! MIDC मधील कंपनीत अचानक बॉयलरचा झाला स्फोट..ज्येष्ठ कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-एमआयडीसी परिसरातील एका नामांकित कंपनीत अचानक झालेल्या भीषण स्फोटाने मोठी खळबळ उडाली आहे.कामावर असताना झालेल्या या अनपेक्षित दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या एका ज्येष्ठ कामगाराचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला.
२० ऑगस्ट रोजी सकाळी ९:२१ च्या सुमारास नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अवघ्या काही क्षणांत होत्याचे नव्हते झाले.नवनागापूर येथील चेतना कॉलनीचे रहिवासी मोतीलाल दौलत वाघ (वय ६९) हे कंपनीत काम करत असताना बॉयलरचा अचानक कानठळ्या बसवणारा स्फोट झाला.
या स्फोटात मोतीलाल यांच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या,ज्यामध्ये नंतर मोठ्या प्रमाणावर संसर्ग (इन्फेक्शन) पसरला.घटनेनंतर त्यांना तातडीने अहिल्यानगरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच २२ ऑगस्ट रोजी पहाटे १:३७ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.रुग्णालयाच्या माहितीनंतर एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.हा स्फोट नेमका तांत्रिक बिघाडामुळे झाला की कंपनीच्या निष्काळजीपणामुळे? याचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दीपक जाधव करत आहेत.
