‘मिशन आपुलकी’! माजी विद्यार्थ्यांची शाळेप्रती अनोखी कृतज्ञता;निमगाव खैरी जि.प.शाळेला दिला अत्याधुनिक प्रिंटर भेट..
निमगाव खैरी (प्रतिनिधी):-आपण ज्या शाळेत घडलो त्या शाळेप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपत, निमगाव खैरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी ‘मिशन आपुलकी’ उपक्रमांतर्गत शाळेला उत्कृष्ट दर्जाचा प्रिंटर भेट दिला आहे. शाळेचे माजी विद्यार्थी इंजिनियर संतोष सगम व पीएसआय राम तुपे यांनी शाळेची प्रशासकीय व शैक्षणिक गरज ओळखून ही मोलाची भेट दिली.
शाळेतील दैनंदिन कामकाज व डिजिटल शिक्षण पद्धतीसाठी प्रिंटरची तातडीची आवश्यकता होती. ही अडचण लक्षात घेऊन माजी विद्यार्थ्यांनी तातडीने पुढाकार घेत शाळेला प्रिंटर उपलब्ध करून दिला. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना तसेच शालेय कामकाजाला मोठी गती मिळणार आहे.याप्रसंगी शालेय आठवणींना उजाळा देताना पीएसआय राम तुपे व इंजिनियर संतोष सगम म्हणाले, “मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. ज्या शाळेत आम्ही शिकलो, त्या शाळेचा होत असलेला कायापालट पाहून मनस्वी समाधान वाटते.” भविष्यातही शाळेच्या प्रगतीसाठी सर्व माजी विद्यार्थी एकत्र येऊन योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विलास शेजुळ यांनी, “माजी विद्यार्थी हे शाळेच्या विकासातील भक्कम आधारस्तंभ असून त्यांच्या सहकार्यामुळे गरजा पूर्ण होत आहेत,” असे गौरवोद्गार काढले.या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश तरस, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विलास शेजुळ, मुख्याध्यापक संतोष वाघमोडे, शिक्षकवृंद प्रतिभा तोरणे, मीना निकम, सुधा गमे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.माजी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या कौतुकास्पद ‘मिशन आपुलकी’ उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी दिपक त्रिभुवन, केंद्रप्रमुख शितल गायकवाड, माजी सभापती नितीन भागडे, सरपंच दत्तात्रय झुराळे,उपसरपंच विजयसिंग परदेशी,उपाध्यक्षा सोनाली साबळे व ग्रामस्थांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले. कार्यक्रमाचे आभार अध्यक्ष गणेश तरस यांनी मानले.
