धक्कादायक! ओढ्याच्या कडेला सुरू होता हातभट्टीचा ‘हा’ काळा धंदा;राज्य उत्पादन शुल्काच्या धाडीने माफियांचे धाबे दणाणले,तब्बल ४.५ लाखांचा मुद्देमाल जागीच खाक!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी शिवारात अत्यंत गुप्तपणे चालवल्या जाणाऱ्या एका मोठ्या काळ्या साम्राज्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे.ओढ्याच्या कडेला,बंधारा क्रमांक २ जवळील उत्तर हिरवे वस्ती परिसरात सुरू असलेल्या हातभट्टी गावठी दारूच्या अड्ड्यावर भरारी पथक क्रमांक १ ने अचानक छापा टाकून माफियांचे धाबे दणाणून सोडले.या थरारक कारवाईत पथकाने तब्बल १ हजार ४५० लिटर तयार गावठी दारू आणि ७ हजार लिटर दारू निर्मितीचे रसायन (वॉश) असा एकूण ४ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट करून संपूर्ण अड्डा उद्ध्वस्त केला.
याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई अधीक्षक नितीन घुले आणि उपअधीक्षक प्रविणकुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुरज कुसळे,दुय्यम निरीक्षक आनंद जावळे,व्ही.जी.चव्हाण,जवान सुरज पवार,सुनील निमसे, सिद्धांत गिरिगोसावी,पांडुरंग गदादे,प्रथमेश पंडित व महिला जवान अर्चना दहिफळे यांनी केले असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक ए.एन.जावळे करीत आहे.यावेळी भरारी पथक क्र.१ चे निरीक्षक सुरज कुसळे यांनी जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती,वाहतूक,विक्री आणि अवैध ढाब्यांवर यापुढेही अशीच अत्यंत कठोर व विनासूचना कारवाई सुरूच राहील.कोणाचीही गय केली जाणार नाही असे स्पष्ट केले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची नागरिकांसाठी महत्त्वाची
सूचना
आपल्या परिसरात कुठेही अवैध दारूची निर्मिती, विक्री किंवा वाहतूक होत असल्यास तत्काळ विभागाच्या टोल-फ्री क्र. १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सॲप क्र. ८४२२००११३३ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल.
