अहिल्यानगर-संभाजीनगरातून ‘गाढवं’ गायब करणाऱ्या टोळीस गजाआड करण्यात LCB ला यश गाडीत दरोड्याची प्राणघातक शस्त्रे सापडताच खळबळ..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पाथर्डीच्या निर्मनुष्य करंजी घाटात मध्यरात्रीच्या घनदाट अंधारात दबा धरून बसलेली एक आंतरराज्यीय टोळी अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकली आहे. पांढऱ्या रंगाच्या संशयास्पद पिकअप गाडीची झडती घेताच पोलिसांना लोखंडी कत्ती,कटावणी आणि थेट डोळ्यात फेकून अंधाधुंद हल्ला करण्यासाठी आणलेली मिरची पूड मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.हा केवळ दरोड्याचा कट नव्हता, तर या टोळीच्या चौकशीतून गाढवांच्या तस्करीचे आंतरराज्यीय रॅकेटही उघडकीस आले आहे.दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला करंजी घाटाच्या पायथ्याशी काही संशयित हालचालींची गुप्त माहिती मिळाली.
पथकाने तातडीने छापा टाकला असता, आंध्रप्रदेशमधून आलेले साईकुमार लक्ष्मीनारायण पालपत्ती (वय २६,जि. बापटला,आंध्रप्रदेश),
यशबाबु व्यंकटेश मोगिली (वय ४५,जि. बापटला,आंध्रप्रदेश),सुधाकर भास्करराव देवारकोडा (वय ४२,जि. बापटला,आंध्रप्रदेश),अंजी श्रीनु कुमाकुला (वय २७, जि.गुंटूर,आंध्रप्रदेश),नागेश वेंकटेश पेनड्रा (वय ४२,जि. वंगुल प्रकाशम,आंध्रप्रदेश),सतीष नागेश्वराव पालेपु (वय ३६,जि.बापटला,आंध्रप्रदेश) हे ६ सराईत गुन्हेगार अंधारात दबा धरून बसलेले आढळले.
अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.आंध्रप्रदेशमधील इतर साथीदारांच्या मदतीने या टोळीने पैठण (छत्रपती संभाजीनगर), पाथर्डी आणि राहाता (अहिल्यानगर) भागातून गाढवांची चोरी करून ती आयशर गाडीतून परराज्यात नेल्याची कबुली दिली आहे.पोलिसांनी या कारवाईत पैठण (गु.र.नं. ३०४/२०२६), पाथर्डी (गु.र.नं. ९३२/२०२६) आणि राहाता (गु.र.नं. २७०/२०२६) मधील चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.दरोड्याच्या तयारीत आढळल्याने आरोपींवर पाथर्डी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३१०(४), ३१०(५) आणि आर्म्स ॲक्टनुसार नवा गुन्हा दाखल करण्यात आला असून पाथर्डी पोलीस पुढील तपास करत आहेत.
