दारूचा महापूर..! रॉयल स्टॅग,मॅकडॉल,इंपेरियल ब्लू अन् रॉयल इन्पॅक्टचे २६ लाखांचे बॉक्स पकडले वाळुंज बायपासवर एलसीबीचा थरारक छापा..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या कडक आदेशांनंतर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने मोठी कारवाई केली आहे.वाळुंज बायपास परिसरात सिनेस्टाइल सापळा रचून गोवा राज्यात विक्रीसाठी असणाऱ्या तब्बल २६ लाख ७७ हजार ९२० रुपये किमतीच्या बेकायदेशीर विदेशी दारूच्या साठ्यासह आयशर टेम्पो आणि चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना २० ऑगस्ट रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,आयशर टेम्पो MH-43-BG-7280) मधून गोवा राज्यात विक्रीसाठी असणारी दारू वाळुंज बायपास मार्गे बेकायदेशीरपणे नेली जात आहे.या माहितीच्या आधारे पोनि.मुटकुळे यांनी तात्काळ कारवाईसाठी पथक रवाना केले.पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांच्यासह अंमलदार संतोष खैरे,विजय ठोंबरे, विशाल तनपुरे,रोहित मिसाळ, प्रताप देवकाते,भगवान थोरात, प्रशांत राठोड व सुनिल मालणकर यांच्या पथकाने पंचांसमक्ष वाळुंज बायपास येथे सापळा रचला.केडगावकडून येणारा संशयित टेम्पो अडवून झडती घेतली असता,त्यात विनापरवाना गोवा बनावटीच्या दारूचे शेकडो बॉक्स मिळून आले.पोलिसांनी तात्काळ वाहनचालक नितीन रमेश तांबसकर (वय ३५,रा. टेंबवाडी,चराटे,ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग) याला ताब्यात घेतले.
आरोपी चालकाकडे सखोल चौकशी केली असता त्याने धक्कादायक माहिती दिली.हा दारूचा साठा फरार आरोपी शत्रुघ्न किरदक (रा. धाराशीव) याच्या सांगण्यावरून,प्रसाद सावंत (रा.खासकिलवाडा, सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग) व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांकडून टेम्पोत भरून करमाळा (जि.सोलापूर) येथे नेला जात असल्याचे उघड झाले.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रताप तान्हाजी देवकाते यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७१९/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये चालकासह इतर फरार साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास नगर तालुका पोलीस करत आहेत.
