धक्कादायक! ‘एक झाड आईच्या नावाने’ फक्त देखावा? पारनेर भूमी अभिलेख कार्यालयातच झाडांची निर्घृण कत्तल..मनसेचा ४८ तासांचा थेट अल्टिमेटम!
पारनेर (प्रतिनिधी):-शासन एकीकडे “एक झाड आईच्या नावाने” आणि “झाडे लावा झाडे जगवा” असा गाजावाजा करत असताना,दुसरीकडे पारनेर शहरातील शासकीय कार्यालयातच पर्यावरणाचा गळा घोटल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पारनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या आवारात असलेल्या सिताफळ, रामफळासह अनेक मौल्यवान सावली देणाऱ्या झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे.झाडांच्या छाटणीच्या नावाखाली हिरवीगार झाडे अक्षरशः तोडून जमिनीवर फेकून दिल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.मनसे तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांचा अधिकाऱ्यांना थेट इशारा,या प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुका अध्यक्ष अविनाश मुरलीधर पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.झाडांची झालेली दुरवस्था पाहून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि वन विभागाकडे कडक शब्दांत तक्रार नोंदवली.एक झाड वाढायला १५ वर्षे लागतात.
जर सरकारी अधिकारीच कायद्याची पायमल्ली करत असतील,तर हा थेट ‘महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियमा’चा भंग आहे.ही कत्तल करताना वन विभागाची परवानगी घेतली होती का? नसेल,तर संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करा असा स्पष्ट इशारा मनसे तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांनी प्रशासनाला दिला आहे.मनसेने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की
दोषी अधिकाऱ्यांवर ४८ तासांच्या आत गुन्हा दाखल करून कारवाई करा.तोडलेल्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात संबंधितांकडून १० नवीन झाडे लावण्याची सक्ती करावी.कारवाई न झाल्यास वन विभाग आणि भूमी अभिलेख कार्यालयासमोर मनसे स्टाईल तीव्र आंदोलन छेडले जाईल.शासकीय आवारातच झालेल्या या बेकायदेशीर वृक्षतोडीमुळे पारनेर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून,आता वन विभाग या मुजोर अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार,याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
