गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी मायेचा हात;‘सक्षम’ संस्थेचा कराडमध्ये स्तुत्य शैक्षणिक उपक्रम
कराड (प्रतिनिधी-विजया माने):-गरिबीमुळे कोणाचेही शिक्षण थांबू नये आणि प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला आत्मविश्वासाने शिकता यावे, याच उदात्त भावनेतून ‘सक्षम’ (समृद्धी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ) या सेवाभावी संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे.कराड येथील श्री संत तुकाराम हायस्कूलमध्ये मंगळवार,१८ ऑगस्ट २०२६ रोजी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात आले.या उपक्रमांतर्गत विद्यालयातील ११ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक आकर्षक दप्तर,६ वह्या आणि कंपास पेटी अशा उपयुक्त शैक्षणिक संचाचे वाटप करण्यात आले.हे साहित्य ‘सक्षम’चे सचिव राजेश चांडक,‘प्रगती टाइम्स’च्या प्रतिनिधी विजया माने तसेच यश कुलकर्णी यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना सुपूर्द करण्यात आले.शालेय साहित्य हाती येताच विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत शिकण्याची नवी उमेद आणि चेहऱ्यावर कृतज्ञतेचा भाव स्पष्ट दिसत होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका एम.एन. पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.त्यानंतर कल्याणकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेच्या या सामाजिक कार्याचा गौरव केला आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व विशद केले.
शेवटी ज्येष्ठ शिक्षिका काशिद यांनी सर्वांचे आभार मानले. शिक्षकवृंद,मान्यवर आणि विद्यार्थ्यांच्या उत्साही उपस्थितीत हा सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यक्रम अत्यंत भावूक आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
