कत्तलीच्या दाढेतून ३ गायींची सुखरूप सुटका ९० हजारांचा मुद्देमाल जप्त..तांत्रिक विश्लेषणाने आवळल्या सराईत चोराच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने अवैध धंदे आणि सराईत गुन्हेगारांविरोधात एकाच दिवशी धडक मोहीम राबवून मोठी कामगिरी केली आहे. एका बाजूला सोनई परिसरात गोवंशीय जनावरांच्या कत्तलीचा मोठा कट उधळून लावत तीन गायींची सुटका करण्यात आली,तर दुसऱ्या बाजूला हायटेक तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर राहुरीतील घरफोडीसह पाथर्डी तालुक्यातील मोटारसायकल व मंगळसूत्र चोरीचे तीन गंभीर गुन्हे उघडकीस आणत एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली ही धडाकेबाज कारवाई पार पडली.जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची कत्तल व अवैध वाहतूक करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते. त्यानुसार उपनिरीक्षक विकास जाधव व त्यांच्या पथकाने सोनई परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकला.नेवासा तालुक्यातील पवार वस्ती (घोडेगाव ते चांदा रोड,भारबोडी नदी पुलाजवळ) येथे हातीम पठाण याने ३ गोवंशीय गायी कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवल्याचे निष्पन्न झाले.
पथकाने तातडीने छापा टाकून सुमारे ९० हजार रुपये किमतीच्या ३ गायींची सुखरूप सुटका केली.आरोपी हातीम शब्बीर पठाण (रा. चांदा,ता.नेवासा) हा फरार झाला असून,त्याच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम व प्राण्यांना निर्दयतेने वागवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच राहुरी फॅक्टरी येथील फिर्यादी शाहुल जॉन वंजारे यांच्या घरात २५ ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केली होती.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे यांच्या पथकाने आधुनिक तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या जाळ्याचा वापर करून आरोपीचा माग काढला.पोलिसांनी गोंडेगाव (ता. नेवासा) परिसरातून रोहन अनिल उर्फ यासीनखाँ भोसले (वय २०) याला शिताफीने ताब्यात घेतले.पोलिसी खाक्या दाखवताच त्याने राहुरीतील घरफोडीसह पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथून दोन मोटारसायकली आणि माळीबाभूळगाव शिवारातून एका महिलेचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून नेल्याची कबुली दिली.हे गुन्हे त्याने त्याचे फरार साथीदार गुलब्या भोसले,राजेश भोसले आणि गुण्या उर्फ सलमान काळे यांच्या मदतीने केल्याचे स्पष्ट झाले आहे.पकडण्यात आलेला आरोपी रोहन भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी शिर्डी, शेवगाव आणि नेवासा पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, दरोडा आणि घरफोडीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.या दोन्ही उल्लेखनीय कारवाया पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोउपनि.विकास जाधव,पोउपनि.संदीप दरवडे, अंमलदार अतुल लोटके, बाळासाहेब नागरगोजे,सागर ससाणे,विष्णू भागवत, फुरकान शेख,प्रशांत राठोड,भाऊसाहेब काळे,किशोर शिरसाठ,आदिनाथ पाखरे,बाळासाहेब खेडकर आणि अरुण मोरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडल्या. पोलिसांच्या या एकाच दिवशी केलेल्या धडक कारवायांमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
